उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:52 AM2024-05-23T08:52:00+5:302024-05-23T08:54:24+5:30

Election Commission of India : उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

Election Commission Of India ordered an inquiry into Uddhav Thackeray press conference | उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु

Uddhav Thackeray : मुंबईत सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या संथ मतदानामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं. मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये यंदा कमी प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळालं. ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने अनेक मतदारांमधील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेन बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मुंबई भाजपने केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा अनुवाद मागवला आहे. मुंबईतील मतदानाच्या संथ गतीवर ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली होती. निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे.

हे ही वाचा -  "एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका

उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे का, याची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या विधानांचे मराठीत भाषांतर मागितल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी मुंबईत संथ मतदानाची अनेक उदाहरणे समोर आल्याने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगवर टीका केली. सरकार लोकांना मतदानापासून परावृत्त करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावले आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.

"या संपूर्ण प्रकरणाची तपासणी कोण करणार आणि उद्धव ठाकरे जे बोलले ते आचारसंहितेचे उल्लंघन आहे की शेलार यांच्या आरोपानुसार लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाईसाठी जबाबदार आहे हे निवडणूक आयोग ठरवेल. ठाकरे यांनी सोमवारी जे सांगितले त्याचा अनुवाद आम्हाला पाठवण्यास सांगण्यात आले आहे," असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Election Commission Of India ordered an inquiry into Uddhav Thackeray press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.