निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी शिबिरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:42 PM2024-08-10T13:42:14+5:302024-08-10T13:42:53+5:30
मतदार नोंदणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर २९ ऑगस्टपर्यंत आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
मुंबई : राज्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन निवडणूक आयोगाकडून केले आहे. १०, ११, १७, १८ ऑगस्ट रोजी शिबिरे होतील. मतदारांची नावे गहाळ झाल्यावरून राजकीय पक्षांनी टीकेचे लक्ष्य केल्यानंतर आयोग ॲक्शन मोडवर आला आहे.
मतदार नोंदणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर २९ ऑगस्टपर्यंत आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी मतदार प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले मतदार होऊ शकतात. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते. मतदारांचे छायाचित्र नाही म्हणून त्यांची नावे मतदार याद्यांमधून लोकसभा निवडणुकीपूर्वी रद्द करण्यात आली, असा आरोप करण्यात आला होता. आता आयोगाने या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन मतदार याद्या, आयोगाच्या नियमानुसार छायाचित्र घेऊन मतदार यादीत सुधारणा करणे तसेच अस्पष्ट छायाचित्र बदलून चांगले छायाचित्र मतदारांकडून घेऊन आधीचे बदलण्याचे काम सुरू आहे.
नाव प्रारूप मतदार यादीमध्ये तपासा
प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे तुम्हाला घरबसल्या बघता येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही यादी डाऊनलोड करून तसेच www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून अथवा वोटर हेल्पलाइन या मोबाइल ॲपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे बघता येईल.
आयोगाने ६ ते २० ऑगस्टदरम्यान एक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या कालावधीत नागरिकांना नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांची नावे, पत्ते आणि अन्य तपशिलात दुरुस्ती करवून घेण्याची संधी आहे.
- डॉ. किरण कुळकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवडणूक आयोग.