मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे निवडणुक आयोगाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 07:08 PM2019-09-27T19:08:05+5:302019-09-27T19:11:48+5:30

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ बाबत मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

Election Commission urges voters to fulfill their national duty by claiming voting rights | मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे निवडणुक आयोगाचे आवाहन

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे निवडणुक आयोगाचे आवाहन

Next

मुंबई: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ बाबत मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तसेच या जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार ८२६ एवढी मतदारसंख्या असून मतदारांना २१ ऑक्टॉबर २०१९ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी ७ हजार ३९७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन व्हावे आणि ही निवडणूक शांततेत, सुरळीतपणे, निःपक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, यासाठी सुमारे ६० हजार कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. तर याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दला व केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे. 

 'विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९' बाबत आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. बोरीकर बोलत होत. याप्रसंगी अप्प‍र जिल्हाधिकारी (प्रभारी) श्री. विवेक गायकवाड, अप्प‍र जिल्हाधिकारी श्रीमती माधवी सरदेशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अजित साखरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

'विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९' च्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी व आतापर्यंत करण्यात आलेली महत्त्वाची कार्यवाही व संबंधित याबद्दलची ठळक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि. 21/09/2019 रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2019 ची घोषणा केली असून आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई उपनगर जिल्हयात दि. 21 ऑक्टोबर 2019 (सोमवार) रोजी मतदान होणार असून दिनांक 24 ऑक्टोबर 2019 (गुरुवार) रोजी मतमोजणी होणार आहे. 

विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे
 
1. अधिसूचना प्रसिध्दीची तारीख
शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019

2. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख
शुक्रवार, दि. 04 ऑक्टोबर, 2019 

3. नामनिर्देशन पत्र छाननीची  तारीख
शनिवार, दि. 05 ऑक्टोबर, 2019 

4. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख
सोमवार, दि. 07 ऑक्टोबर, 2019 

5. मतदान दिवस
सोमवार, दि. 21 ऑक्टोबर, 2019

6. मतमोजणी दिवस
गुरूवार, दि. 24 ऑक्टोबर, 2019 
 
मुंबई उपनगर जिल्हयात 26 विधानसभा मतदार संघ आहेत. या जिल्हयात एकूण 7226826 मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार 3929232 व स्त्री मतदार 3297067 व 527 इतर मतदार आहेत,  तसेच 7397 मतदान  केंद्रे आहेत.  निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी  सुमारे 60000 कर्मचारी  कार्यरत असणार आहे. केबल / दूरचित्रवाणी / सोशल मिडीया तसेच इतर दृकश्राव्य माध्यमांव्दारे प्रसारित करावयाच्या निवडणूक जाहीरातीची पडताळणी व परवानगीसाठी मिडीया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण हे मतदारसंघ निहाय १३० Video Surveillance Team, १०४ Flying Squad Team,  १०४ Static Surveillance Team च्या स्वतंत्र पथकांमार्फत करण्यात येणार आहे. तर Video Viewing Team (VVT) च्या ७८ आणि Accounting Team AT च्या २६ चमू नियुक्त करण्यात आल्या आहेत. 

निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती आवश्यक असल्यास टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वीत करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्हयासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1800-222-110 कार्यान्वीत करण्यात आलेला आहे.

सखी मतदान केंद्र

‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणा-या 'स्वीप' (SVEEP) कार्यक्रमाची अधिकाधिक परिपूर्ण अंमलबजावणी मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु आहे. याच अंमलबजावणीचा भाग म्हणून लिंगभेद निर्मूलन जाणीवजागृतीसह महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये मतदानाच्या दिवशी केवळ महिला कर्मचा-यांद्वारे संचालित होणारे प्रत्येकी एक मतदान केंद्र प्रतिकात्मक स्वरुपात उभारण्यात येणार आहे.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वयंसेवक

दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच दिव्यांग मतदार व मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांना मदतनीस म्हणून स्काऊट व गाईड यांची मदत घेण्यात येणार आहे. इव्हीएम यंत्रावर ब्रेल लिपीमध्ये देखील माहिती असणार आहे, ज्यामुळे संबंधित दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणे सुलभ होणार आहे. तसेच गरजुंसाठी व्हिल-चेअरची व्यवस्था असणार आहे.

'जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदानाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑकटोबर २०१९ रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. 

मतदान केंद्रांवरील सोयी सुविधांबाबत

माननीय भारत निवडणूक आयोगाने यंदा Accessible Election घोषित केले आहे. त्या प्रमाणे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे . यामध्ये प्रामुख्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे हि तळमजल्यावरच असतील, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी या जिल्ह्यात १ हजार ९७३ मतदान केंद्रे ही पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर होती. त्यापैकी १ हजार ५०६ मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थानांतरित करण्यात आली आहेत. तर ४६७ मतदान केंद्रांवर उद्वाहनाची सोय असल्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आहेत.

वरील तपशिलानुसार सर्व मतदान केंद्रावर मतदार मदत केंद्राची व्यवस्था, मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी व शौचालय यांच्या सुविधेसह मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक देखील लावण्यात येणार आहेत.

आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात

'विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मुंबई उपनगर जिल्हयात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या अनुषंगाने संबंधित विभागाद्वारे आतापर्यंत २७ गुन्हे दाखल झाले आहेत. या अनुषंगाने ६ हजार २१९ लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत रुपये सुमारे २ लाख इतकी आहे. 

EVM व VVPATs

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ करीता खालील प्रमाणे  EVM/VVPAT उपलब्ध आहेत.  
 BU
CU
VVPAT
13968
9681
10321
 

खर्चाची मर्यादा

उमेदवारचा  प्रचार विषयक खर्च निश्चित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं सोबत बैठक घेण्यात आली असून खर्चासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून दर ठरविण्यात आले आहेत. 
यानुसार विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा – रू.२८ लाख इतकी आहे. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे महानिरिक्षकांची नियुक्ती करण्यात येत  आहे. तर  १० निवडणूक खर्च निरीक्षक नेमण्यात आले आहेत. 

प्रशिक्षण

मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुयोग्य प्रकारे संपन्न व्हावी, यासाठी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना विविध स्तरीय प्रशिक्षण नियमितपणे देण्यात येत आहे.

Web Title: Election Commission urges voters to fulfill their national duty by claiming voting rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.