मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचे अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:42 AM2019-03-02T05:42:48+5:302019-03-02T05:42:51+5:30

राजकीय पक्षांनाही फायदा : गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत; नाव बदलणे, पत्त्यात बदल करणे होणार सोपे

Election Commission's app for voters | मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचे अ‍ॅप

मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचे अ‍ॅप

Next

- चेतन ननावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आणि राजकीय पक्षांना विविध परवानग्या घेण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. या अंतर्गत सामान्य मतदारांसह दिव्यांग मतदारांसाठीही विशेष अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.


सर्वसामान्य मतदारांना मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, नावनोंदणीचा अर्ज आदी सुविधा देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला आदेश दिले आहेत. आदेशानुसार मतदारांसाठी १९५० ही हेल्पलाइनही कार्यरत असेल. यासोबतच एनव्हीएसपी पोर्टलच्या मदतीने मतदारांना नाव वगळणे, पत्त्यात बदल आदी कामे सहज करता येतील.


‘द व्होटर हेल्पलाइन’ या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना मतदार यादीतील नावे शोधता येतील. सोबतच आॅनलाइन नावनोंदणीचा अर्ज करतानाच अर्जाची सद्य:स्थितीही पाहता येईल. या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रत्येक प्रकारचा अर्ज, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, प्रेस
नोट आदी महत्त्वाच्या सूचना मिळतील.

दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप
दिव्यांग मतदारांना नावनोंदणीसह पत्ता बदल अशा सर्व सुविधा पीडब्ल्यूडी या अ‍ॅपमध्ये मिळतील. महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग मतदारांनी मोबाइल क्रमांकाची नोंद केल्यास निवडणुकीवेळी मतदान केंद्र अधिकारी संबंधित दिव्यांग मतदाराला सर्व आवश्यक सुविधा पुरवतील. सध्या या अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात असून निवडणुकीच्या घोषणेपूर्वी ते सेवेत येईल. या अ‍ॅपचा फायदा राज्यातील सव्वादोन लाख दिव्यांग मतदारांना होईल.

Web Title: Election Commission's app for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.