निवडणूक धमाका: झोपडीवासीयांना अडीच लाखांत घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 06:20 AM2023-05-26T06:20:48+5:302023-05-26T06:21:09+5:30

१० लाख कुटुंबांना फायदा मिळणार, २००० ते २०११ या १२ वर्षांसाठी निर्णय लागू करणारा आदेश जारी

Election explosion: slum dwellers get new house for two and a half lakhs in Maharashtra | निवडणूक धमाका: झोपडीवासीयांना अडीच लाखांत घर!

निवडणूक धमाका: झोपडीवासीयांना अडीच लाखांत घर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळात अस्तित्वात असलेल्या झोपड्यांतील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) अवघ्या अडीच लाखांत घरे देण्याचा आदेश गृहनिर्माण विभागाने गुरुवारी काढला. मुंबईतील सुमारे १० लाख झोपडीधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या झोपडीधारकांना पुनर्वसित घरे सशुल्क देण्याचा निर्णय घेतला होता. गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी गुरुवारी त्या निर्णयाची पूर्तता केली. १ जानेवारी २००० पूर्वीच्या पात्र झोपडीधारकांना पुनर्वसित घर मोफत देण्यात येत होते. तथापि, १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीतील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर देताना ते सशुल्क द्यावे, असा निर्णय १६ मे २०१८ रोजी राज्य सरकारने घेतला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 

मात्र हे शुल्क किती असावे, हे निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीने २.५० लाख रुपये इतके शुल्क निश्चित केले. राज्य मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिली होती. त्यानुसार गुरुवारी आदेश काढण्यात आला.

 काय असतील निकष?
१ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २०११ या काळात संबंधित झोपडीत वास्तव्य असल्याचे पुरावे तपासून सशुल्क पुनर्वसनासाठी झोपडीधारकास पात्र ठरविले जाईल. त्यासाठीच्या अटी व शर्ती काय असतील, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण; मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या मान्यतेने घेतील. या कालावधीतील झोपड्यांच्या जागेवर पुनर्वसन योजना आधी उभी झालेली असेल वा भविष्यात उभी राहणार असेल, अशा दोन्हीही परिस्थितीत २.५० लाख रुपये इतकेच शुल्क आकारले जाणार आहे.

राज्यात १० लाख कुटुंबांना घरे देणार-फडणवीस
सोलापूर : राज्य बेघरमुक्त करण्यासाठी वर्षभरात राज्य सरकारने दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्या समाजासाठी घरांच्या योजना नाहीत, त्यांच्यासाठीही योजना आणण्यात येणार असून १० लाख कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. अनुसूचित जाती, जमातींप्रमाणे ओबीसींसाठीही स्वतंत्र घरकूल योजना राबविण्याचे फडणवीस यांनी गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केले होते. आता आणखी काही समाजघटकांसाठी ही योजना येण्याची शक्यता आहे.

झोपडीवासीयांची दिवाळी 
मुंबईतील झोपडीधारकांना अडीच लाखांत घर देण्याच्या या निर्णयाने १० ते १२ लाख कुटुंबांना हक्काचे घर मिळेेल. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षे याबाबत झोपले होते. शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी निर्णय घेतला. झोपडीवासीयांसाठी आजचा दिवस दिवाळीसारखा आहे.
- आ. आशिष शेलार, 
अध्यक्ष, मुंबई भाजप.
 

Web Title: Election explosion: slum dwellers get new house for two and a half lakhs in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.