हुजलंती गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार
By admin | Published: February 17, 2017 08:31 PM2017-02-17T20:31:31+5:302017-02-17T20:31:31+5:30
मंगळवेढा तालुका : ढोबळे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत
हुजलंती गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार
विलास मासाळ - मंगळवेढा :
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती जि़ प़ गटाला माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे अधिक महत्व आले आहे़ या गटात दुरंगी होणारी लढत ढोबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आता तिरंगी होणार आहे़ शिवाय ही निवडणूक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे़
हुलजंती जि़ प़ गटामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या पाठींब्यावर अनुराधा ढोबळे या निवडणूक अपक्ष म्हणून लढवित आहेत. आवताडे गटाच्या जनहित विकास आघाडी मंगळवेढा यांच्या वतीने शीला सचिन शिवशरण तर अपक्ष म्हणून कविता दत्तात्रय खडतरे या निवडणूक रिंगणात आहेत़ खरी लढत ही अनुराधा ढोबळे विरूध्द शीला शिवशरण यांच्यामध्ये होणार आहे. या जि़ प़ गटात अनुराधा ढोबळे या कोणत्या पक्षाकडून लढतात की बिनविरोध होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत काँगे्रस, राष्ट्रवादी, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी यांनी उमेदवार दिला नव्हता व अन्य अपक्ष उमेदवारांनी अनुराधा ढोबळे यांच्या विरोधातील अर्ज माघारी घेतल्याने त्या बिनविरोधातील होतील, असा अंदाज कार्यकर्त्यांमध्ये होता. बिनविरोध होण्यासाठी लक्ष्मणराव ढोबळे यांनी अर्ज भरल्यापासून अनेक उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व विनंत्याही केल्या़ अखेरपर्यंत त्यांनी प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांना पाठविले. मात्र शेवटपर्यंत त्यांना पत्नी अनुराधा ढोबळे यांना बिनविरोध करण्यासाठी सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.
अखेर एकदाची निवडणूक लागली़ सध्या हुलजंती गटात तिरंगी लढत होत आहे़ आवताडे गटाच्या जनहित विकास आघाडी मंगळवेढातर्फे शीला शिवशरण यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून अनुराधा ढोबळे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे़ या शिवाय दुसऱ्या अपक्ष उमेदवार कविता खडतरे या निवडणूक रिंगणात आहेत़ त्या कोणाची मते खेचणार यावर बरेच अवलंबून आहे़ सध्या या गटातील उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे़ उर्वरित दोन दिवसांत कोण, कोणती राजकीय खेळी करणार? यावर या गटातील उमेदवारांचे भवितव्य असेल़
बिनविरोध होण्याऐवजी लागली निवडणूक
हुलजंती जि़ प़ गटातील सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे या तिघांनीही आपल्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार नाही, असे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आवर्जुन सांगितले होते, मात्र आवताडे गटाच्याच उमेदवाराने अखेरपर्यंत अर्ज माघारी घेत नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी निवडणूक लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता लक्षवेधी ठरणार आहे़ आता हीच निवडणूक तालुक्यात सर्वाधिक चर्चेली जात आहे़ या निवडणुकीत लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे़
हुलजंती, मरवडे गणात तिरंगी लढत
हुलजंती गणामध्ये रेणुका भगवानराव जाधव-पाटील (अपक्ष), चन्नम्मा गुरुनिंगप्पा बिराजदार (भाजप), सुधाकर प्रेरणा मासाळ (जनहित विकास आघाडी मंगळवेढा), महादेव जकाप्पा सोमुत्ते राष्ट्रवादी (काँग्रेस) अशी तिरंगी लढत होणार आहे. तसेच मरवडे गणामध्ये ही चंद्रकांत एकनाथ इंगळे (भाजप), प्रकाश अरूण काळुंगे (काँग्रेस), प्रदीप वसंत खांडेकर (जनहित विकास आघाडी मंगळवेढा) अशी तिरंगी लढत होत आहे़