पाच जिल्हा परिषदांसाठी ७ जानेवारीला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:35 AM2019-11-20T02:35:58+5:302019-11-20T02:36:00+5:30

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबारचा समावेश

Election for January 5 for five Zilla Parishad | पाच जिल्हा परिषदांसाठी ७ जानेवारीला निवडणूक

पाच जिल्हा परिषदांसाठी ७ जानेवारीला निवडणूक

Next

मुंबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषद व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. निकाल ८ तारखेला जाहीर करण्यात येतील.

जिल्हा परिषद सदस्यांच्या आरक्षणासंदर्भात घोळ झाल्याने या पाच जिल्हा परिषदांमधील निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने अखेर आज त्या ठिकाणचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सध्या या पाचही जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक नेमण्यात आले आहेत. निवडणूक होत असलेल्या पाचपैकी तीन विदर्भातील तर दोन उत्तर महाराष्ट्रातील आहेत. या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ती ८ जानेवारीपर्यंत कायम राहील. निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी ही माहिती दिली.

कोणत्या जिल्हा परिषदेत किती सदस्य
नागपूर ५८
अकोला ५३
वाशीम ५२
धुळे ५६
नंदुरबार ५६

निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज सादर करणे -
१८ ते २३ डिसेंबर २०१९
उमेदवारी अर्जांची छाननी -
२४ डिसेंबर
अपील नसल्यास उमेदवारी अर्ज मागे घेणे - ३० डिसेंबर
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे - १ जानेवारी २०२०
मतदान - ७ जानेवारी
मतमोजणी - ८ जानेवारी

प्रशासकापूर्वी कोणाची सत्ता?
नागपूर - भाजप-शिवसेना युती. अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे.
अकोला - अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी.
वाशीम - काँग्रेस.
धुळे - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी. अध्यक्ष, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे
नंदुरबारमध्ये -काँग्रेस. अध्यक्षपद काँग्रेसकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे.

३४ जि. प. अध्यक्षपदाची सोडत जाहीर
मुंबई : राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. आरक्षण काढताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.
जिल्हा परिषदांनिहाय अध्यक्षपदाचे आरक्षण असे - अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना. अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद. अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली. अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड.
खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा. खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर.

Web Title: Election for January 5 for five Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.