निवडणूकीपूर्वी कर्मचार्यांच्या आंदोलनाला ऊत
By admin | Published: August 4, 2014 11:50 PM2014-08-04T23:50:56+5:302014-08-05T01:18:31+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आशा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचार्यांना लागली आहे.
खामगाव : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आशा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचार्यांना लागली आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी सर्वच विभागातील कर्मचार्यांची आंदोलने सुरु केली आहेत. सद्या सुरु असलेला महसूल कर्मचार्यांचा संप आज ४ ऑगस्ट रोजी ४ थ्या दिवशीही सुरुच असुन आता तहसीलदारही संपात उतरणार आहेत. निवडणूकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. त्यानंतर कर्मचार्यांना आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी नवीन सरकारकडे जावे लागणार आहे. मात्र सद्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी होणार्या घोषणांच्या पावसात आपल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचारी संघटनांची आंदोलने होत आहेत. यापूर्वी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतर ग्रामसेवकांनी मागण्यांबाबत कामबंद आंदोलन पुकारुन ग्रामपंचायतच्या चाब्या पं.स.मध्ये जमा केल्या होत्या. त्यानंतर नगर परिषद कर्मचारी, सफाई कामगारांनी सुध्दा संप पुकारला होता. तर आता गेल्या १ ऑगस्टपासून महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद व आता महसूल विभागातील कामकाज प्रभावित झाले आहे. खामगावसह जिल्ह्यातील सर्वच उपविभागातील १00 टक्के कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत. कर्मचार्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी या आंदोलनामुळे नागरिकांना मात्र त्रस्त व्हावे लागत आहे. त्यातच खामगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांनीही आपल्या मागण्यांबाबत बेमुदत कामबंद आंदोलन १ ऑगस्टपासून सुरु केले आहे. हे आंदोलन सुध्दा आज ४ थ्या दिवशीही सुरुच होते. एकूणच या आंदोलनांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)