महापौर पदाची निवडणूक २१ जून रोजी
By admin | Published: June 6, 2016 11:42 PM2016-06-06T23:42:59+5:302016-06-06T23:51:06+5:30
अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक २१ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश सोमवारी सायंकाळी काढले
अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक २१ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश सोमवारी सायंकाळी काढले असून नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कवडे हे मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत.
विद्यमान महापौर अभिषेक कळमकर यांची मुदत ३० जूनला संपत आहे. त्या अगोदरच महापौर पदाची निवडणूक घ्यावी लागते. सेनेने सुरेखा संभाजी कदम यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित करून संख्याबळाची जुळवाजुळव केली आहे. सेनेने नगरसेवक सहलीवरही रवाना केले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या गोटात अजूनही शांतता आहे. महापौर पदाची निवडणूक सेनेने प्रतिष्ठेची केली असून सत्तापक्षाचे नगरसेवकही सेनेच्या गळाला लागले आहेत. मनसेच्या तीन नगरसेवकांना सोबत घेण्यात सेना यशस्वी झाले आहे. सेनेने महापौर पदाचा उमेदवार घोषित केला असला तरी उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. सावेडीतील मनिषा बारस्कर-काळे, उषा नलावडे, बाबासाहेब वाकळे, तसेच मालन ढोणे यांनी उपमहापौर पदावर दावा केला आहे. खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांच्यासाठी गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महापौर महिला होणार असल्याने उपमहापौरही महिलाच असावी असा हट्ट भाजपच्या उपमहापौर पदाच्या दावेदारांनी धरला आहे. आघाडीत मात्र महापौर व उपमहापौर दोन्ही पदासाठी उमेदवारच निश्चित झालेला नाही. संख्याबळ जुळत नसल्याने उमेदवार निश्चित होत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. (प्रतिनिधी)
पक्षनिहाय बलाबल
शहर विकास आघाडी २१
(राष्ट्रवादी)
शिवसेना १९
कॉँग्रेस ११
भाजप ०९
मनसे ०४
अपक्ष ०४
सेना-भाजपचे संख्याबळ २८ आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सेनेला ७ नगरसेवकांची कमी होती. मनसेचे तीन, कॉँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी आघाडीचे तीन तसेच दोन अपक्षांना सोबत घेत त्यांना सहलीवर रवाना केले आहे. त्यामुळे आवश्यक संख्याबळापेक्षा अधिक नगरसेवक सेनेने सहलीवर रवाना केले आहेत.