महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 07:00 AM2019-07-12T07:00:00+5:302019-07-12T07:00:02+5:30

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Election or selection in college | महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयांमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया अधिक जवळून अनुभवता येईल, अशी शक्यता व्यक्त

पुणे: महाविद्यालयांतीलविद्यार्थी निवडणुका खुल्या पध्दतीने घेतल्या जाणार असल्या तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात निवडणुकीसाठी प्रचार व प्रसार करता येणार नाही. कोणत्याही संघटनांचा पाठिंबा घेवून पोस्टर,बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी गर्दी करून संवाद साधता येणार नाही. केवळ प्राचार्यांनी दिलेल्या ठराविक जागेत स्वत:ची भूमिका स्पष्ट करून मतदान करण्याचे आव्हान करता येईल. त्यामुळे महाविद्यालयात इलेक्शन होणार आहे की सिलेक्शन असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुकांबाबत प्राचार्यांच्या कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. त्यात विद्यार्थी निवडणुकांबाबतची प्रक्रिया स्पष्ट केली जात आहे. मात्र,महाविद्यालयीन निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या जाचक नियमावलीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही पध्दतीने निवडणुक लढवता येणार नाही. त्यामुळे देशातील इतर राज्यात ज्या पध्दतीने खुल्या निवडणुका होतात,त्याच पध्दतीने महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना निवडणुक लढविण्याची संधी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सुमारे मंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक घेवून महाविद्यालयात खुल्या पध्दतीने निवडणुका घेण्याबाबत चर्चा केली होती.त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, विद्यार्थी संघटनांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेशच दिला जाणार नसल्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाविद्यालयांमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया अधिक जवळून अनुभवता येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात स्वत:ची भूमिका मांडण्यासाठी मोकळीक दिली गेली नाही. तर पूर्वीच्या निवडणूक पध्दतीत आणि नव्या विद्यापीठ कायद्यानुसार घेतल्या जाणा-या निवडणुक पध्दतीत फरक राहणार नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे इलेक्शन घ्यावे  त्यांचे सिलेक्शन करू नये,असे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.
----------------
विद्यार्थ्यांना खुल्या पध्दतीने निवडणुक लढविण्याची संधी मिळाली पाहिजे.पूर्वीच्या पध्दतीनुसारच या पुढील काळात निवडणुक घेतली तर विद्यार्थ्यांना निवडणुक प्रक्रियेचे ज्ञान मिळणार नाही.त्यामुळे शासनाने यात आवश्यक सुधारणा कराव्यात.
कल्पेश यादव, अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.
---------------------
महाराष्ट्रातील विद्यार्थी निवडणुका या इतर राज्यात ज्या पध्दतीने होतात,त्याच पध्दतीने व्हाव्यात.दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत विविध संघटनांना निवडणुक प्रक्रियेत सहभागी होता येते.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुका झाल्या पाहिजेत.महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे इलेक्शन व्हावे;सिलेक्शन नको.- किरण साळी, उपशहर प्रमुख,शिवसेना

......................

विद्यार्थी निवडणुका लोकशाही पध्दतीने झाल्या पाहिजेत.लोकसभा,विधानसंभेवर प्रतिनिधी निवडून जातात.त्याचप्रमाणे विद्यार्थी महाविद्यालयातून निवडून यावेत.तसेच विद्यार्थी संघटनांना महाविद्यालयीन निवडणूकांमध्ये प्रवेश दिला जाणार नसेल तर शिक्षण मंत्र्यांनी सर्व विद्यार्थी संघटनांच्या बैठका का घेतल्या होत्या.निर्बंध घालून निवडणूका घेतल्या तर विद्यर्थ्यांमधून नेतृत्व उभे राहणार नाही.
 - ॠषी परदेशी,अध्यक्ष ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

.......................

विद्यार्थी संघटनांना महाविद्यालयीन निवडणूकांपासून दूर ठेवणे योग्य नाही.विलासराव देशमुख,नितीन गडकरी,गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते विद्यार्थी निवडणुकांमधूनच तयार झाले.त्यामुळे महाविद्यालयात खुल्या पध्दतीने निवडणुका घेतल्या जाव्यात.तसेच या निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनांना सामावून घ्यावे.
- अक्षय जैन,एनएसयुआय,राष्ट्रीय प्रतिनिधी

Web Title: Election or selection in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.