कुणाल पाटीलविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली
By Admin | Published: October 27, 2015 01:55 AM2015-10-27T01:55:07+5:302015-10-27T01:55:07+5:30
गेल्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार कुणाल (बाबा) रोहिदास पाटील यांच्या निवडणुकीस आव्हान
मुंबई : गेल्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार कुणाल (बाबा) रोहिदास पाटील यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळली.
कुणाल पाटील यांच्याकडून ४६,०८२ मतांनी पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार मनोहर दत्तात्रय भदाणे यांनी ही याचिका केली होती. पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या व कुटुंबीयांच्या मालमत्तांची संपूर्ण माहिती दिली नाही, तसेच सरकारकडून मिळालेल्या कंत्राटाची माहितीही दडवून ठेवली. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेल्याने, त्यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्याऐवजी आपण विजयी झाल्याचे जाहीर करावे, अशी भदाणे यांची विनंती होती.
मात्र, भदाणे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील व्ही. डी. होन व पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ वकील पी.एम. शहा यांचा युक्तिवाद सविस्तर ऐकल्यानंतर न्या. मदन टी. पाटील यांनी याचिका फेटाळली.
कुणाल पाटील संचालक असलेल्या समृद्धी रिसोर्सेस लि. या कंपनीने महाराष्ट्र मारिटाइम बोर्डाकडून कौथनी मिनिपोर्टचे एक टर्मिनल भाडेपट्ट्याने घेतले आहे. परंतु त्यांनी प्रतिज्ञापत्रात याची माहिती दिली नाही, असा भदाणे यांचा मुद्दा होता, परंतु या संदर्भात कायद्याला जे ‘सक्षम सरकार’ अपेक्षित आहे, त्याच्या व्याख्येत मारिटाइम बोर्ड येत नाही, हे अॅड. होन यांनीही मान्य केले. परिणामी, या मुद्द्यावर पाटील निवडणूक लढण्यास अपात्र ठरत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.
कुणाल पाटील काही कंपन्यांचे संचालक आहेत, पण त्यांनी या कंपन्यांच्या मालमत्ता व देणी यांचा तपशील दिला नाही, तसेच ते काही सार्वजनिक विश्वस्त निधींचेही विश्वस्त आहेत.
उमेदवार आणि त्याच्या निकटवर्ती कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता व देणी यांची मतदारांना माहिती व्हावी, हा प्रतिज्ञापत्र करायला लावण्यामागचा मुख्य उद्देश आहे, परंतु म्हणून हा तर्क आणखी ताणून उमेदवाराने तो स्वत: किंवा त्याचे कुटुंबीय संचालक किंवा विश्वस्त असलेल्या कंपन्या व ट्रस्ट यांच्या मालमत्ता व देण्यांचाही तपशील द्यावा, असे म्हटले जाऊ शकत नाही. (विशेष प्रतिनिधी)