सर्वच पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

By admin | Published: February 11, 2017 04:03 AM2017-02-11T04:03:42+5:302017-02-11T04:03:42+5:30

रायगड जिल्ह्यात २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

Election Reputation for All Parties | सर्वच पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

सर्वच पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

Next

रोहा/धाटाव : रायगड जिल्ह्यात २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाचा धुरळा शांत होतो न होतो तोच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, यासाठी साऱ्यांची धावपळ उडाली. आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपला संपर्क मतदारांपर्यंत वाढवण्यावर भर दिला आहे. मात्र, मागील निवडणुकीपेक्षा प्रत्येक गणात व गटात मतदारांची संख्या वाढल्याने उमेदवारांचीही दमछाक होताना दिसते. तर या निवडणुकीत आता कोण किती मताधिक्य घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान निवडणूक आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात अचानक निवडणुकीची तारीख जाहीर केल्याने इच्छुकांची चांगलीच धावपळ उडाली. रोह्यात सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून काही ठिकाणी प्रचाराचे नारळसुद्धा फुटले आहेत. रोहा तालुका हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीची शेकाप पक्षाबरोबर या निवडणुकीत आघाडी झालेली आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी कुठला मतदारसंघ कुणासाठी सोडायचा, याबाबतचे निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये यापूर्वीच आघाडी करताना झालेला आहे. केवळ कार्यकर्त्यांना थोपविण्यासाठी हे सोपस्कार केले जात असल्याचे जाणकार सांगत आहेत. दुसरीकडे शिवसेनेने रोहा नगरपालिका निवडणुकीत ओढलेली ‘री’ पुन्हा ओढत राष्ट्रवादीतून आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेत आलेले निवडणूक होताच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत दाखल झाल्याची घटना ताजी असताना सेना नेत्यांनी यातून काहीही बोध घेतलेला दिसत नाही. परिणामी, तालुक्यात राष्ट्रवादी विरोधात वातावरणाचा लाभ सेनेला घेता आलेला नसून नागोठणे वगळता इतर सर्वत्र सेनेची पीछेहाट होणार असल्याचे जाणकार सांगतात.
तालुक्यात अपक्ष उमेदवारांनाही चांगले दिवस आल्याचे रोहा नगरपालिका निवडणुकीत दिसून आले होते. रोहा नगराध्यक्ष निवडणुकीत केवळ सहा मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या समीर शेडगे यांच्या निवडणुकीची सर्व रणनीती आखणारे सेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे यांनी अपक्ष म्हणून खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. तरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचे भवितव्य आता एकूण १ लाख १५ हजार ८१२ मतदारांच्या हाती असून, याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)


मतदारांच्या संख्येत वाढ : मागील २०१२ला झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रोह्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांमध्ये एकूण मतदारांची संख्या १ लाख ९ हजार ७८० पैकी पुरु ष मतदार ५६ हजार ७९७, तर महिला मतदारांची संख्या ५२ हजार ९८३ एवढी होती. यावर्षी रोहा तालुक्यात मतदार संघ पुनर्रचनेत झालेल्या घडामोडीत जिल्हा परिषदेचे चणेरा व भातसई हे गट कमी झाल्याने नव्याने निर्माण झालेला खारगाव हा गट तयार करण्यात आला आहे. मात्र, बाकी जैसे थेच राहिले आहेत. तर पंचायत समितीचे देवकान्हे व भातसई हे दोन गण कमी झाल्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवाराला याचा फटका बसला आहे. यामध्ये यावर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत मागील मतदारांपेक्षा एकूण ६०६२ मतदारांची वाढ झाली आहे. यामधे पुरु ष मतदारांची संख्या २ हजार ७४९ असून, महिला मतदारांची संख्या वाढ३ हजार २८३ एवढी झाली आहे. रोहा तालुक्यात गटनिहाय मतदारांची संख्या २१ जानेवारी रोजीच्या अंतिम मतदार यादीप्रमाणे जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीच्या एकूण आठ गणात १ लाख १५ हजार ८१२ मतदार एवढीआहे. यामध्ये एकूण पुरु ष मतदार ६० हजार ८० असून, महिला मतदार ५५ हजार ७३२ एवढे आहेत.

मुरुडमध्ये होणार तिरंगी लढत; खरी लढत आघाडी आणि शिवसेनेत
1 बोर्ली-मांडला :मुरुड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागा आहेत. या सर्व आरक्षित जागेसाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस आय, राष्ट्रवादी व शेकापप्रणीत आघाडी यांच्यातर्फे आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामुळे मुरुड तालुक्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपाचे या ठिकाणी ठरावीकच मतदार असल्याने तुल्यबळ खरी लढत ही आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये होणार आहे मुरुड तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट तर पंचायत समितीचे चार गण आहेत. 2 गेल्या महिन्यात मुरुड नगरपरिषदेतील निवडणुका सर्व पक्षीय आघाडी असतानासुद्धा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, तालुकाप्रमुख नीलेश घारवळ, चंद्रकांत कवळे यांनीसुद्धा कंबर कसली आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी तालुकाप्रमुख तथा सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक भरत बेलोसे यांनी सेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.3 ग्रामीण भागात शेकापप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते कार्यरत आहेत. मुरुड सारख्या शहरातील निवडणुकीस सामोरे जाताना सेनेला विजयश्री मिळणे सद्यस्थितीत अवघड वाटत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे पाहिले तर शेकापला ग्रामीण भागात अधिक मताधिक्य मिळालेले आहे. त्यातच बोर्ली, उसरोलीसारख्या मोठ्या ग्रा. पं. या शेकापच्या ताब्यात आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कारकीर्दीत हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला होता.4आ. सुनील तटकरे यांच्या काळात तालुक्यात राष्ट्रवादी फोफावली. तरीही शेकापचे मोठे प्राबल्य ग्रामीण भागात होते. भाजपा प्रभाव फारसा नाही. शिवसेनेचा भगवा नगरपरिषदेवर फडकल्यानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे; परंतु शिवसेनेचा ग्रामीण भागात कितपत प्रभाव राहील हे येणारा काळ सांगेल. कारण राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप हे तिन्ही पक्ष हे आपसातील वैयक्तिक भांडण सोडून आघाडीत सामील झाल्याचे मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडीक यांनी सांगितले.

Web Title: Election Reputation for All Parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.