‘शिक्षण प्रसारक’ची निवडणूक अवैध
By admin | Published: June 17, 2015 03:53 AM2015-06-17T03:53:07+5:302015-06-17T03:53:07+5:30
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक बेकायदेशीर ठरवून धर्मादाय उपायुक्तांनी मंडळाने केलेला फेरफार अर्ज
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक बेकायदेशीर ठरवून धर्मादाय उपायुक्तांनी मंडळाने केलेला फेरफार अर्ज (चेंज रिपोर्ट) फेटाळला; परंतु निर्णयास दोन आठवड्यांची स्थगिती दिली.
मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष विठ्ठलराव लहाने व सरचिटणीस मधुकरअण्णा मुळे यांच्या कार्यकारिणीला आव्हान देत आ. सतीश चव्हाण यांनी १० जुलै २०१३ रोजी मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेतली होती. त्यात निवडण्यात आलेल्या कार्यकारिणी मंडळास मान्यता व फेरफारसाठी (चेंज रिपोर्ट) चव्हाण यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे अर्ज केला होता. त्यास मधुकरअण्णा मुळे, किरण जाधव, चंद्रशेखर शेलार यांनी आक्षेप घेतला होता. कार्यकारिणी निवडणूक बेकायदेशीर असून न्यासाच्या नियम व नियमावली आणि कायदाभंग करणारी असल्याचे आक्षेप अर्जात नमूद करण्यात आले होते.
धर्मादाय उपायुक्त सोनुने यांनी विश्वस्त मंडळातर्फे वर्दी देणारा, निवडणूक अधिकारी व निवडणूक प्रक्रियेची छायाचित्रे टिपणारा छायाचित्रकार हे साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फेरफार अर्ज त्यांनी फेटाळला.
निवडणूक प्रक्रिया अवैध होती व ती निवडणूक रद्द करावी, अशी आमची मागणी होती. शेवटी सत्य ते समोर आले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आनंद आहे, असे मुळे यांनी सांगितले तर धर्मादाय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे मंडळाचे विद्यमान सरचिटणीस चव्हाण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)