राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 08:26 PM2024-08-10T20:26:31+5:302024-08-10T20:27:11+5:30
बीडमधील झालेल्या प्रकारावरून मनसेचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना इशारा, आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं, निवडणूक ही युद्ध समजू नये
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना बीड येथे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकून आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना चोप दिल्याची घटना घडली. मात्र या घटनेवरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक आहे युद्ध नाही, कुणी आपले दुश्मन नाहीत असं सांगत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना फटकारलं आणि सर्वपक्षातील कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे.
मुंबईत पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात आणि मराठी माणसांत कुठेही फूट नये. जास्त वाद नको. येणारी निवडणूक ही निवडणूक आहे युद्ध नाही हे समजून सर्वच कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे. बीडमध्ये उत्स्फूर्त काही झालं असेल पण मी सर्वच कार्यकर्त्यांना सांगतो, हे होणं योग्य नाही. कोणी कुणाचं दुश्मन नाही. हे युद्ध नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय येणारी निवडणूक घमासान होणार आहे. शाब्दिक वार होणार आहेत. टीका-टीप्पणी होणार, आरोप प्रत्यारोप होतील पण कुणीही बेसिक मर्यादा पाळावी. मी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना हे सांगतोय. कुणाविरुद्ध कुणी असं नसून ही निवडणूक आहे. पक्षविरुद्ध पक्ष व्हायलाच पाहिजे. विचारधारा वेगळ्या असतात पण कुठेही युद्ध समजून नव्हे तर निवडणूक समजून पुढचं वातावरण नीट व्हावं. गढूळ होऊ नये असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जरांगे पाटील यांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत. काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत दिला.