सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा, तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:08 AM2021-05-14T08:08:33+5:302021-05-14T08:18:08+5:30
सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.
राजकुमार सारोळे -
सोलापूर: २५ दिवसांच्या संचारबंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम आहे. गेल्या ४० दिवसांत ५५ हजार ६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १ हजार २३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एप्रिल व मेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आणि मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये १५ हजार ३०९ रुग्ण आढळले होते. नवीन वर्षात एप्रिलमध्ये ३६ हजार २३६ रुग्ण तर ७४० जणांचा मृत्यू झाला. १० मेपर्यंत दहा दिवसांत १९ हजार ३८४ पॉझिटिव्ह तर ४९५ जणांचा मृत्यू झाला. मेमध्ये शहरातील रुग्ण कमी झाले आहेत; पण ग्रामीण भागातील लाट कायम आहे. ग्रामीणमध्ये दररोज सरासरी दोन हजार पॉझिटिव्ह व ४० जणांचा मृत्यू तर शहरात १८० पॉझिटिव्ह व १० जणांचा मृत्यू अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला असून तो १५ मेपर्यंत वाढविला आहे.
पोटनिवडणुकीनंतर संसर्ग
सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या तालुक्यांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. राजकीय बैठका, नेत्यांचे दौरे, सभा यामुळे मंगळवेढा, पंढरपूर व बाजूच्या तालुक्यात संसर्ग वाढला. निवडणुकीनंतर या तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांत शेजारच्या जिल्ह्यातून लोक आल्याने संसर्ग वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सातारा
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग कडक लॉकडाऊननंतरही कमी व्हायचे नाव घेत नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमुळे जो धुराळा उडाला त्याची बाधा सोलापूरकरांना
झाली आहे. तर अपुरी यंत्रणा असतानाही प्रशासन जीव तोडून काम करीत असतानाही सातारकरांचा बेजबाबदारपणा नडतोय, असे चित्र आहे.
ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात काेरोनाचा संसर्ग वाढला, पुणे, मुंबई व कर्नाटकातून आलेल्या लोकांमुळे सीमावर्ती तालुक्यात संसर्ग वेगाने पसरला. त्यानंतर पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय बैठकांमुळे ही वाढ झाल्याचे दिसत आहे.
- डाॅ. शीतलकुमार जाधव,
जिल्हा आरोग्य अधिकारी, साेलापूर
सातारा जिल्ह्यात प्रशासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा सामना करत आहे; पण नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची खरी आवश्यकता आहे. शासन नियमांचे पालन करावे. तसेच गृहविलगीकरणातील बाधितांनी पूर्ण बरे होईपर्यंत
बाहेर पडू नये.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा