विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:36 AM2021-12-04T10:36:42+5:302021-12-04T10:37:10+5:30
Mahavikas Aghadi Government : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे.
मुंबई : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
पटोेले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या फेब्रुवारीत दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. काँग्रेसच्या कोट्यात असलेले पद ११ महिन्यांपासून भरता आलेले नाही. अध्यक्षपदाच्या निवडीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून निवड आवाजी मतदानाने केली जाईल. या संबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आणून ते मंजूर केले जाईल व नंतर अधिवेशनातच अध्यक्षपदाची निवड घेतली जाईल.
महाविकास आघाडी सरकारकडे १७० सदस्यांचे संख्याबळ विधानसभेत आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार निवडून देण्यात कुठलीही अडचण नाही. त्यातच भाजपचे १२ सदस्य निलंबित आहेत. त्यात गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, हरिश पिंपळे, पराग अळवणी, राम सातपुते, अभिमन्यू पवार, कीर्तीकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. तरीही कुठलीही जोखीम नको म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.
विधानसभा नियम समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आता विधानसभेत ठराव मांडून नियमात सुधारणा केली जाईल. समितीच्या बैठकीत भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला गेल्या फेब्रुवारीमध्ये एक पत्र लिहून मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड करा, असे सांगितले होते. मात्र तरीही निवड झाली नाही.
विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने केली जाईल. त्यासाठीचे सुधारणा विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणू. इतर काही राज्यांमध्येदेखील हीच पद्धत आहे. त्यात गैर काहीही नाही.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने करणे म्हणजे नियमांना तिलांजली देवून मनमानी सुरू असल्याचे लक्षण आहे. संपूर्ण बहुमताचा दावा करणारे लोकशाहीचा खून करायला निघाले आहेत. यातच तीन पक्षांमध्ये परस्पर किती अविश्वासाचे वातावरण आहे हे सिद्ध होते.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता, विधानसभा