मीरा भाईंदरमधील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:10 PM2021-11-11T21:10:11+5:302021-11-11T21:10:45+5:30
भाईंदर व मीरारोड येथील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर तेथे महापालिकेने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर व मीरारोड येथील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर तेथे महापालिकेने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे .
भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० ड मधून २०१७ साली निवडून आलेले शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे गेल्या वर्षी कोरोना मुळे निधन झाले होते . त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली आहे . जेणे करून सेनेचे संख्याबळ सुद्धा १ ने घटले आहे .
मीरारोडच्या नया नगर भागातून प्रभाग २२ अ मधून काँग्रेसच्या उमा सपार ह्या २०१७ साली बिनविरोध निवडून आलेल्या होत्या . त्यांचे काही महिन्या पूर्वी आजारपणाने निधन झाल्याने ती जागा सुद्धा रिक्त आहे . महापालिकेची मुदत पुढील वर्षी ऑगस्ट मध्ये संपुष्टात येत आहे . तर निवडणूक आयोगाने दोन्ही मतदार संघातून पोटनिवडणूक घेण्याच्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत .
त्या अनुषंगाने महापालिका शुक्रवार १२ नोव्हेम्बर रोजी ह्या दोन्ही प्रभागातील प्रारूप मतदार यादी जाहीर करणार आहे . त्या प्रारूप यादीवर १२ ते १६ नोव्हेंबर पर्यंत हरकती , सूचना देता येणार आहेत . १७ रोजी प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून २२ रोजी मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल . त्या नंतर १२ मार्च २०२२ रोजी मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे . त्यामुळे ह्या दोन्ही पोटनिवडणूक पुढील वर्षी होणार असून पुढील वर्षीच होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागण्याची शक्यता आहे .