उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर
By admin | Published: June 16, 2014 10:30 PM2014-06-16T22:30:39+5:302014-06-16T22:48:28+5:30
राजपत्रात उपाध्यक्षपदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी उलथापालथ होत असून
बुलडाणा : राज्यातील नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकींना ७ जून रोजी राज्य मंत्रीमंडळाने स्थगिती दिली होती. मंत्रीमंडळाने प्रसिद्ध केलेल्या या राजपत्रात उपाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्यामुळे उपाध्यक्षांना मुदतवाढ मिळाली की नाही याबाबत राजकीय व प्रशासकीय स्तरावर संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम अखेर दूर झाला असून आज उपाध्यक्ष पदासाठी २१ जून रोजी निवडणूक होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. राज्यपालांच्या संमतीने प्रधान सचिव ह.बा.पटेल यांनी काढलेल्या राजपत्रात नगरपालिका अध्यक्ष, महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा आदेश काढत या पदांना मुदतवाढ दिली होती. मात्र, या राजपत्रात उपाध्यक्षपदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी उलथापालथ होत असून नगरपालिकांमधील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकांमुळे त्यात आणखी भर नको अशा अंतस्थ हेतूने या निवडणुका पुढे ढलकण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या एका चुकीमुळे या राजपत्रात उपाध्यक्ष हा शब्द टाकल्या गेला नाही व प्रशासन तांत्रिक अडचणीत सापडले. बुलडाणा येथे १३ जून रोजी नगरपालिकेच्या सर्व मुख्याधिकार्यांना उपाध्यक्ष निवडणुकीसंदर्भात सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मात्र, न.प. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्याने हे मुख्याधिकारी परतले. येत्या २६ जून रोजी उपाध्यक्षपदाची मुदत संपत असून त्यापुर्वी निवडणुका होणे आवश्यक होते त्यामुळे प्रशासनाने पुर्वतयारी केली होती. ती अखेर प्रत्यक्षात आली असून आता २१ जून रोजी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी आज निवडणूक कार्यक्रम घोषित करुन संबंधितांना सूचना दिल्या आहेत.