निवडणुकीचा फड दशक्रिया घाटावरही!
By admin | Published: January 9, 2017 02:11 AM2017-01-09T02:11:49+5:302017-01-09T02:11:49+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्यास अजून कालावधी असताना खेड तालुक्यात मात्र निवडणुकांचे वातावरण ऐन थंडीच्या दिवसांत
आंबेठाण : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्यास अजून कालावधी असताना खेड तालुक्यात मात्र निवडणुकांचे वातावरण ऐन थंडीच्या दिवसांत भलतेच तापले आहे. या निमित्ताने निवडणुकीच्या चर्चा आता तर गावच्या चावडीबरोबरच दशक्रिया विधीच्या घाटावरदेखील चांगल्याच रंगू लागल्या आहे.
जिल्ह्यासह राज्यात केव्हाही जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक एकाच वेळी होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. राजकीय क्षेत्रातील घडामोडींमुळे जिल्ह्यासह राज्यात कायम चर्चेत असणारा खेड तालुका यात आताही काही मागे नाही. तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आहेत, तर पंचायत समितीचे १४ गण आहेत. तालुक्यात आजपर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांत लढत होत होती. या पक्षाबरोबर भाजपानेदेखील चांगलेच बाळसे धरले आहे. आळंदी नगर परिषदेत सत्ता आल्याने तालुक्यात सध्या भाजपाचे वारे जोरदार वाहत आहे. काँग्रेसनेदेखील सर्व जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. देशात आणि राज्यात सध्या भाजपा आणि शिवसेनेचे सरकार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना कशी लढत देतात याचीच तालुक्यात सध्या चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात जवळपास चौरंगी ते पंचरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पक्षातून संधी मिळेल असा अनेकांचा कयास आहे. आणि या सर्वांमधून संधी नाही मिळाली तर या सर्वांच्या लढतीत आपण अपक्ष म्हणून सरळ निघून जाऊ असा अनेकांचा अंदाज आहे.
गावच्या चावडीवर चालणारे राजकारण दशक्रिया विधी आणि मयताच्या स्मशानभूमीत नेऊन ठेवले आहे. अशा दु:खद प्रसंगी अनेकजण माझ्या या पाहुण्याला मदत करा, हा माझा जावई आहे. तो भाचा आहे, तो व्याही आहे असे सांगत प्रचार सुरु केला आहे. लक्ष असू द्या असे सांगत आहेत. (वार्ताहर)
मतदारांच्या पाया पडणे सुरू : ओळखीचे नसले तरी लगट..
१ सध्या लग्नसराईचे दिवस कमी आहेत. त्यामुळे गर्दी जमण्याचे आयते ठिकाण म्हणून अनेकजण मयत आणि दशक्रिया विधीच्या ठिकाणी जाऊन सरळसरळ प्रचार करीत सुटले आहे. भर दशक्रिया विधीच्या घाटावर काहीजण तर महाराज मंडळी सोडून मतदारांच्या पाया पडत सुटले आहे. नात्यागोत्याच्या या स्थानिक राजकारणात अनेकांनी पद एका पक्षाचे आणि प्रचार दुसऱ्या पक्षाचा असा सपाटा सुरू केला आहे. आजवर विश्वास ठेवून ज्या नेत्यांनी पदांची खिरापत वाटली, तेच कार्यकर्ते आता तर पक्ष निष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.
२ अनेकांनी प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्यापूर्वी प्रचार सुरु केला असून, त्यासाठी पाहुण्यांची यादीच तयार केली आहे. तालुक्यात काही उमेदवार असे आहेत की रस्त्याने जाताना येताना कोणीही भेटला काय पाहुणे काय चाललंय? बरे आहात ना पाहुणे? असे विचारपूस करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. भलेही ते ओळखीचे नसले तरी चालेल; पण उगाचच त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.