२०८ नगरपालिकांत मेमध्ये निवडणुका? एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:33 PM2022-02-23T13:33:47+5:302022-02-23T13:37:51+5:30
नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील.
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या वा लवकरच मुदत संपणार असलेल्या २०८ नगरपालिकांमध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचालींना आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा जो कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला तो लक्षात घेता एप्रिलच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होईल व निवडणूक मे मध्ये होईल, अशी शक्यता आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील नगरपालिकांचा त्यात समावेश आहे.
मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या अ वर्गातील एकूण १६, मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मुदत संपत असलेल्या ६७ आणि ९ मार्च २०२२ रोजी मुदत संपत असलेली एक अशा ब वर्गातील ६८ आणि एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मुदत संपत असलेल्या क वर्गातील १२० तसेच नवनिर्मित चार नगर परिषदांतील निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत.
नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २२ मार्च रोजी सुनावणी देतील. २५ मार्चपर्यंत आयोगाला अहवाल देतील. १ एप्रिलपर्यंत आयोग अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल. त्याच सुमारास अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण जाहीर केले जाईल. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर निवडणूक आयोग विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या आधारे प्रभागांची मतदार रचना जाहीर करेल व त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. ही प्रक्रिया साधारणत: १८ ते २० एप्रिलदरम्यान पूर्ण होईल व त्यानंतर आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल. हा संपूर्ण कार्यक्रम लक्षात घेता २०८ नगरपालिकांची निवडणूक मे मध्ये होईल, असे चिन्ह आहे.