सामान्यांची निवडणूक केवळ बोटावरच्या शाईपुरतीच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:19 AM2019-10-14T04:19:18+5:302019-10-14T04:19:39+5:30
नवमतदारांचे मत : शिक्षणाचा बाजार, शेतकरी आत्महत्या, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभे
मुंबई : निवडणुकीत सामान्य मतदारांच्या हातात काहीच येत नाही. फक्त बोटावर शाई दिसते... ही प्रतिक्रिया आहे एका नवमतदार विद्यार्थ्यांची. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना ‘लोकमत’ने विद्यार्थी, नवमतदार यांच्या मनातील मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात एका विद्यार्थ्यांने अशी मार्मिक टिपण्णी केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वसामान्य भेडसावणारे प्रश्न, रोजगाराची समस्या यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. अवांतर विषयांचीच चर्चा जास्त होत आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या वर्तुळात आहे. राजकीय नेते आणि विधानसभेच्या उमेदवारांकडून तीच-तीच आश्वासने, घोषणा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणूक महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील विषय प्रचारामध्ये मांडले जाणे अपेक्षित आहे, असे मत नवमतदार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिक्षणाचे खासगीकरण, रोजगाराचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या असे अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आ वासून उभे आहेत, परंतु कोणताही राजकीय नेता यावर भाष्य करत नाही. वादग्रस्त वक्तव्य, शेरेबाजी, टोलवाटोलवी, आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका जिंकल्या जातात.
ज्या सरकारकडून काहीतरी नवीन बदल घडेल, अशी अपेक्षा होती. त्यांनीदेखील पूर्वीच्या सरकारच्या पावलांवर पाऊल ठेवले. ज्या सरकारने सांगितले की, भ्रष्टाचारी राजकर्त्यांना जेलमध्ये टाकू, पण त्यांनी अशा उमेदवारांना त्यांच्याच पक्षात घेऊन उमेदवारी दिली. यंदाच्या निवडणुकीत मत कोणाला करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यघटनेने सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा अधिकार दिला आहे. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांची, पालकांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणताही नेता बोलत नाही. काहींना ईडीची भीती वाटत असेल, त्यामुळे मूग गिळून गप्प बसले असतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारा परेश जाधव याने दिली.
काही नेते पक्ष सोडून जिथे सत्ता आहे तिथे गेले. अशा नेत्यांची स्वार्थीवृत्ती यातूनच दिसून येते. असे उमेदवार निवडून आले, तर त्यांच्याकडून कोणत्या प्रकाराची लोकसेवेची कामे होतील, यात शंका आहे. प्रचारातील मुद्दे, घोषणा ऐकून कीव येत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारी श्रेया पांचाळ हिने दिली.
फक्त ‘मन की बात’ म्हणत मतदारांची दिशाभूल
सध्या महाराष्ट्रात ज्या प्रचारसभा चालू आहेत, त्यामध्ये ३७०, राफेल, राममंदिर यासारख्या भावनिक मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात आपले राजकीय नेते बोलताना दिसतात. विधानसभा निवडणूक ही राज्यातील स्थानिक प्रश्नांवर लढवायची असते. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, शिक्षणाचे खासगीकरण यावर कोणीही बोलत नाही. राज्याच्या हिताची एकही गोष्ट राजकीय नेते करत नाहीत. फक्त मन की बात म्हणत मतदारांची दिशाभूल केली जाते, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारा तुषार मांडवकर याने दिली.