संमेलनाध्यक्षासाठी निवडणुका हव्यातच!
By admin | Published: June 6, 2014 12:57 AM2014-06-06T00:57:02+5:302014-06-06T00:57:02+5:30
यासंदर्भात साहित्यिकांची मते जाणून घेतली असता निवडणुका रद्द करणे प्रायोगिक तत्त्वावरही योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. काही मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने
साहित्य महामंडळाच्या प्रस्तावाला महामंडळ सदस्यांचा विरोध
यासंदर्भात साहित्यिकांची मते जाणून घेतली असता निवडणुका रद्द करणे प्रायोगिक तत्त्वावरही योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. काही मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने देण्यात यावे, अशी महामंडळाच्या अध्यक्षांची भूमिका आहे. याबाबत बरेच चर्वितचर्वण गेली अनेक वर्षे सुरू आहे. संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणार्या अनेक उमेदवारांनीही यापूर्वी संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने देण्यात यावे, अशी भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळेच यंदा महामंडळानेही मतदारांचा आणि महामंडळ सदस्यांचा कौल जाणून घेण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने की, निवडणुकीने या विषयावर साहित्य क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. यातही फार कमी लोक संमेलनाध्यक्षपद सन्मानाने देण्यात यावे, याच मताचे आहे. पण बहुतेकांना निवडणुकीला पर्याय नाही असेच वाटते. अनेक मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष होण्यासाठी निवडणूक लढविणे कमीपणाचे वाटते. पण त्यात काहीही कमीपणा नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर आरुढ होणार्यांनाही अर्ज भरून द्यावा लागतो. काही साहित्यिकांना मात्र अर्ज भरून देणे, हा देखील कमीपणा वाटतो. पण ते सर्वथा चुकीचे आहे. याशिवाय दुसर्या बाजूने विचार केला तरीही निवडणुकीला पर्याय नाही. कारण एखाद्याला सन्मानाने संमेलनाध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मतदारांचा आणि साहित्य व्यवहारातील लोकांचा सहभाग नसणार आहे. १३ कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व निवडून न आलेले महामंडळाचे १८ सदस्य घेऊ शकत नाही. त्यांनी घेतलेला निर्णय सर्व घटक संस्थांच्या सदस्यांनाही मान्य होण्यासारखा नाही.
ज्या मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष व्हायची इच्छा आहे पण अर्ज भरणे, निवडणुकीत उभे राहणे आदींना विरोध आहे, अशा मान्यवर साहित्यिकांचा महामंडळाने विचारच करू नये, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मुळात खरेच जे साहित्यिक मोठे आहेत, ते संमेलनाध्यक्ष न होताही मोठेच असतात. यात विजय तेंडुलकर, जी. ए. कुळकर्णी, कवी ग्रेस ही नावे आहेतच. त्यांनी संमेलनाध्यक्ष होण्याची इच्छाही व्यक्त केली नाही आणि संमेलनांकडेही ते फिरकले नाही. पण साहित्यक्षेत्रात ही माणसे निर्विवाद मोठी आहेत. त्यामुळेच ३१ मे च्या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई मराठी संघ, विदर्भ साहित्य संघ यांच्यासह छत्तीसगड, कोकण येथील लोकांनीही निवडणुका रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध स्पष्टपणे नोंदविला. हे प्रकरण साधक- बाधक चर्चेनंतर पुढील महिन्याच्या बैठकीत निकाली काढण्याचे ठरविण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात काही उंचीची माणसे आहेत. ते स्वत:हून संमेलनाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त करीत नाहीत.
पण असे प्रगल्भ साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत आणि संमेलनाध्यक्षपदाची उंची सातत्याने वाढती राहावी, कायम राहावी, हा महामंडळाचा उद्देश चांगला आहे. त्यामुळे अशा साहित्यिकांना संमेलनाध्यक्षपदी आरुढ करण्याची स्वाभाविक इच्छा महामंडळाला होणे, चुकीचे नाही. पण त्यासाठी निवडणूक रद्द करणे. हे घटनाबाह्य आहे. पु. ल. देशपांडे, राम शेवाळकर, केशव मेश्राम, दुर्गाबाई भागवत, विश्राम बेडेकर हे साहित्यिक निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी हे साहित्यिक बिनविरोध निवडून यावेत म्हणून महामंडळाने प्रयत्न केला आणि संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. एखादा साहित्यिक खरेच मोठा असेल तर मतदारही त्याला निवडून देतात. त्यामुळे मान्यवर साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष करण्यासाठी महामंडळाने ती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करता येण्यासारखा आहे पण निवडणूक रद्द करणे मात्र योग्य नाही. दुर्गाबाई भागवत उभ्या होत्या तेव्हा वा. कृ. चोरघडे निवडणुकीत उभे होते. त्यांची उंची मान्य करुन चोरघडे यांनी अर्ज मागे घेतला होता. निवडणूक पद्धतच योग्य आहे, अशी भूमिका स्पष्टपणे विदर्भ साहित्य संघाने घेतली आहे. यासंदर्भात अनेक महामंडळ सदस्यांशी संपर्क साधला. त्यांनी निवडणूकच असावी, असे मत व्यक्त केले. पण महामंडळ सदस्य म्हणून नियमाप्रमाणे अधिकृतरीत्या आपण प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.