आरक्षण रद्द झालेल्या वाॅर्डांत १८ जानेवारीला निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:53 AM2021-12-18T05:53:03+5:302021-12-18T05:53:24+5:30
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राखीव जागा न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या करण्याचा निर्णय घेत तिथे १८ जानेवारीला निवडणूक होईल, ...
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राखीव जागा न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या करण्याचा निर्णय घेत तिथे १८ जानेवारीला निवडणूक होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषित केले. अन्य जागांसाठीची निवडणूक आधी जाहीर केल्याप्रमाणे २१ डिसेंबरला होईल. या निर्णयामुळे राज्यातील सरकारला धक्का बसला आहे. निवडणूक ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत पुढे ढकला, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारच्या वतीने आयोगास देण्यात आले. मात्र, तोवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
१०६ नगरपंचायतींमधील ३४४ जागा, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेतील २३ जागा, त्या अंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांमधील ४५ जागा, चार महापालिका वॉर्डांपैकी एका जागेवर (सांगली) १८ जानेवारीला निवडणूक होईल. या शिवाय, ४५५४ ग्रामपंचायतींमधील ७१३० एकूण पदांपैकी अनारक्षित ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गात १८ जानेवारीलाच निवडणूक होईल. चार महापालिका जागांपैकी ज्या तीन जागांवर (धुळे, अहमदनगर, नांदेडमधील प्रत्येकी एक) २१ डिसेंबरला मतदान तर मतमोजणी मात्र २२ डिसेंबरला होईल.
मतमोजणी होणार १९ जानेवारीला
२१ डिसेंबर आणि १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारीला होईल. निवडणूक आयोगाने ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागा खुल्या प्रवर्गात आणून त्यात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. महिला आरक्षणाची सोडत त्या-त्या ठिकाणी होईल अन् त्यानुसारच १८ जानेवारीला निवडणूक होईल.