विधान परिषदेच्या ६ जागांची २१ मे रोजी होणार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:07 AM2018-04-21T01:07:54+5:302018-04-21T01:07:54+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.
ज्या सहा जागांची निवडणूक होत आहे त्या अशा (कंसात विद्यमान आमदार आणि त्यांचे पक्ष) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अनिल तटकरे -राष्ट्रवादी), नाशिक (जयंत जाधव-राष्ट्रवादी), उस्मानाबाद-लातूर-बीड (दिलीपराव देशमुख-काँग्रेस), परभणी-हिंगोली (बाबा जानी दुर्रानी-राष्ट्रवादी), अमरावती (प्रवीण पोटे-भाजपा) आणि चंद्रपूर (मितेश भांगडिया-भाजपा). राष्ट्रवादीकडे ३, भाजपाकडे २, काँग्रेसकडे १ जागा आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगले
यश मिळाल्याने भाजपाची मतदारसंख्या वाढली आहे. मित्रपक्ष शिवसेनेने साथ दिली तर दोघांनाही फायदा होईल.
भाजपाचा विचार करता उस्मानाबाद-लातूर-बीडची जागा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल. तीन जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर
राहील.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना अशी आघाडी/युती झाली आणि मतदार पक्षाशी प्रामाणिक राहिले तर तुल्यबळ लढती होतील. स्वबळावर जागा जिंकणे प्रत्येक पक्षाला कठीण जाणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपाची २४७ व शिवसेनेची ५१ अशी २९८ तर काँग्रेसची १४१ व राष्ट्रवादीची २५१ अशी ३९२ मते आहेत. परभणी-हिंगोलीत भाजपाची ५१ व शिवसेनेची ९९ अशी १५० मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५९ आणि काँग्रेसकडे १३१ अशी २९० मते आहेत.
नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे. चंद्रपूरमध्ये भाजपाकडे तब्बल ४८३, शिवसेनेकडे ४५ अशी दोघांची मिळून ५२८ मते आहेत. त्या मानाने काँग्रेसकडे २४९ आणि राष्ट्रवादीकडे ७१ अशी ३२० मते आहे. ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची २४७ आणि भाजपाची १३५ मिळून ३८२ मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५५, काँग्रेसकडे
१३३ अशी २८८ मते आहेत. कोकणच्या या एका जागेसाठी खा. नारायण राणे आणि शेकापचे आ. जयंत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.