‘आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:12 AM2023-12-21T06:12:42+5:302023-12-21T06:12:55+5:30
२३ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेत घराघरातील मराठा एकत्र येणार आहे. सरकारने आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री (जि. जालना) : फेब्रुवारीच्या अधिवेशनात क्युरेटीव पिटीशनवरील आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. परंतु, ती आमची मागणी नाही. आमच्या मागणीनुसारचे आरक्षण २४ डिसेंबरच्या आतच मिळणार आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ते विशेष अधिवेशन क्युरेटीव पिटीशनबाबतच्या आरक्षणासाठी आहे आणि ते मिळाले तरी एनटी, व्हीजेएनटीसारखे टिकेल की नाही, हा प्रश्न आहे. दोन महिने घ्यायचे आणि नंतर पुन्हा आरक्षणासाठी लढायचे, असे आता आम्हाला करायचे नाही. त्यामुळे आमच्या मागणीनुसार २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.
२३ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेत घराघरातील मराठा एकत्र येणार आहे. सरकारने आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये.
- मनोज जरांगे-पाटील, मराठा आंदोलनाचे नेते