जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:59 AM2021-07-08T11:59:14+5:302021-07-08T11:59:53+5:30
१९ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती.
मुंबई : राज्यातील पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पुन्हा केली.
१९ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती. मात्र, निवडणूक घेण्यावर आयोग ठाम राहिले. त्यावर, राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य शासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले होते. पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी लेखी विनंती राज्य शासनाने पुन्हा केल्यानंतर गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली आयोगात बैठक होणार असून, मुख्य सचिव कुंटे आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील.