Electoral Bonds: शिवसेनेचा 'भक्कम बॉण्ड'; पुण्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 85 कोटींची 'मजबूत' देणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 04:29 PM2024-03-22T16:29:35+5:302024-03-22T17:06:55+5:30
Electoral Bonds And Shivsena : शिवसेनेला तब्बल 152.4 कोटी रुपये मिळाले असून त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम ही बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्सने दिली आहे.
इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये भाजपाला सर्वाधिक पैसे मिळाले आहेत. तर दुसऱ्या नंबरवर तृणमूल काँग्रेस आणि तिसऱ्या नंबरवर काँग्रेस आहे. शिवसेनेला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पुण्यातील बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडून सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान शिवसेनेला तब्बल 152.4 कोटी रुपये मिळाले असून त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम ही बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्सने दिली आहे.
शिवसेनेला सर्वाधिक देणगी देणारी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने शिवसेनेला 85 कोटी आणि 2023-24 दरम्यान भाजपाला 30 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या वर्षी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्सला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यामध्ये 20448 फ्लॅट्सचं 4,652 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे.
बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने जून 2019 ते 2022 या तीन वर्षांत एकही बॉण्ड घेतला नाही. मे 2019 मध्ये एक कोटी 'आप'ला आणि 50 लाख भाजपाला दिले आहेत. यानंतर कंपनीने 2023-2024 मध्ये बॉण्ड घेतले आहेत. क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेडकडून शिवसेनेला जानेवारी 2022 मध्ये 25 कोटी देण्यात आले.
शिवसेनेला पीआरएल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने 5 कोटी, अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड, युवान ट्रेडिंग कन्सल्टन्सी, दिनेशचंद्र आर अगरवाल इन्फ्राकॉन, जेनेक्स्ट हार्डवेअर पार्क्स, टोरेंट पॉवर लिमिटेड यांनी प्रत्येकी 3 कोटी रुपये दिले आहेत. सेन्च्युरी टेक्स्टाईल्स एक कोटी, जिंदाल पॉली फिल्म्स 0.5 कोटी आणि सुला वाइनयार्डसने 0.3 कोटी दिले आहेत.