चुनावी जुमले

By Admin | Published: February 16, 2017 12:29 AM2017-02-16T00:29:21+5:302017-02-16T00:29:21+5:30

निवडणुका आल्या की, अमुक करून देतो, तमुक आणून देतो, अशा घोषणांनी मतदारांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायची. मात्र, निवडणुकीनंतर विजयी

Electoral participation | चुनावी जुमले

चुनावी जुमले

googlenewsNext

निवडणुका आल्या की, अमुक करून देतो, तमुक आणून देतो, अशा घोषणांनी मतदारांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायची. मात्र, निवडणुकीनंतर विजयी उमेदवार जे गायब व्हायचे, ते पुढची पाच वर्षे फिरकायचेच नाहीत. त्यामुळे मतदार शहाणे झाले. एका पालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या राहत्या बिल्डिंगला रंग लावून घेतला, तर कुठे दोन वर्षांचे केबलचे बिल भरायला लावले, कोणी हाउसिंग सोसायटीत फरश्या बसवून घेतल्याचे तर कोणी कम्पाउंड वॉल बांधून घेतल्याचे किस्से नंतर विजयी उमेदवार सांगू लागले. हा हिशोब धरून निवडणुकीत किती खर्च झाला ते सांगितले जाऊ लागले, पण या झाल्या व्यक्तिगत फायद्याच्या गोष्टी. निवडणूक प्रचारात ‘परसेप्शन’ तयार करण्यासाठी स्वप्नरंजन करणाऱ्या आश्वासनांची फोडणी दिली जाऊ लागली. अनेकदा भाजी कमी आणि फोडणीच जास्त असाही प्रकार घडू लागला.
आश्वासनांची खैरात अगदी चंद्र, तारे तोडून आणून देऊ... इथपर्यंत जाऊ लागली, पण निवडणुका झाल्या की, या घोषणा ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगितले जाऊ लागले. काँग्रेसने असाच एक जुमला केला होता, मोफत लाइटबिलाचा. वीजबिल माफ करणार, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती, पण सत्तेवर आल्यानंतर ती जाहीरनाम्यातली प्रिंटिंग मिस्टेक होती, असे सांगून ज्या हातावर लोकांनी ठप्पा मारला, तेच हात काँग्रेसने वरती करून टाकले. भाजपाने लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होतील, अशी घोषणा केली, पण पुढे ती ‘चुनावी जुमला’ असल्याचे अमित शहा यांनी सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. आमचे सरकार आले की ‘अच्छे दिन’ येणार असे रान पेटवणाऱ्या भाजपाचे सरकार आल्यानंतर मात्र, ‘अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गई’ असे सांगून टाकले. राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या नव्या घोषणेने मुंबईकरांना असेच अचंबित केले आहे. कोस्टल रोडच्या माध्यमातून मुंबईकरांना नरिमन पॉइंट ते दहिसर हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येईल, अशी धम्माल घोषणा करणारे होर्डिंग्ज भाजपाने मुंबईत लावले. सोबत ‘हा माझा शब्द आहे’ असे सांगून हे लोढणे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात बांधले गेले. आज मितीला आहे त्या रस्त्यांनी नरिमन पॉइंटहून दहिसरला जाण्यासाठीचे अंतर ७६.२ कि.मी. आहे. त्यासाठी २ ते सव्वादोन तास लागतात. कोस्टल रोडच्या नकाशानुसार, हे अंतर ३५ ते ४० कि.मी. होणार आहे. ४० कि. मी. अंतर पार करण्यासाठी तुमची गाडी ताशी १२० कि.मी. वेगाने चालवावी लागेल, तेदेखील कोठेही एक क्षण न थांबता... कोस्टल रोडची वळणे आणि मुंबईची वाहतूक पाहाता, हा शब्द कसा पुरा केला जाणार आहे, हे ती घोषणा करणाऱ्यांनाच ठाऊक. अवघ्या २४०० मीटर लांबीचा जे. जे. उड्डाणपूल पार करण्यासाठी गर्दी नसलेल्या वेळेत किमान ५ ते ७ मिनिटे लागतात. अशा वेळी नरिमन पॉइंट ते दहिसर हे ४० कि.मी.चे अंतर २० मिनिटात कसे पार होणार, असे ‘एका शब्दाने’ एकाही विरोधकाला विचारावे वाटले नाही.
युती सरकार सत्तेवर आल्यानंतर, २०१९ पर्यंत ११ लाख परवडणारी घरे बांधणार, अशी घोषणा या आधी केली होती. त्याला आता अडीच वर्षे झाली. मात्र, अद्याप एकही घर बांधून झालेले नाही. आता नवीन होर्डिंग्ज लागले आहेत, ज्यावर ‘२०२१ पर्यंत प्रत्येकाला घर’ ही घोषणा केली गेलीय...

Web Title: Electoral participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.