अलिबागमध्ये वीज वाहिन्या तुटल्या

By admin | Published: June 27, 2016 02:10 AM2016-06-27T02:10:18+5:302016-06-27T02:10:18+5:30

एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा फटका रविवारी अलिबागमध्ये बसला.

Electric bolts broken in Alibaug | अलिबागमध्ये वीज वाहिन्या तुटल्या

अलिबागमध्ये वीज वाहिन्या तुटल्या

Next


अलिबाग : एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा फटका रविवारी अलिबागमध्ये बसला. ‘लोकमत’च्या कार्यालयासमोरील उच्च दाबाच्या जिवंत तारा तुटून खाली पडल्या. त्यामुळे रस्त्यावरील एक मोटारसायकलस्वार आणि चारचाकी वाहनातील प्रवासी बालंबाल बचावले. विशेष म्हणजे काहीवेळा पूर्वीच एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी तेथे खांबावरील तांत्रिक बिघाड दूर केला होता. ही घटना दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
उच्च दाबाच्या जिवंत तारा तुटून पडल्याने फार मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. रस्त्यावरुन मोटारसायकलस्वार जात असताना त्याच्या पुढ्यातच विजेच्या तारा लोंबकळत खाली त्यांच्या अंगावर येताच तो खाली कोसळला. तारा खाली पडल्या तेव्हा आगीच्या ठिणग्याही सर्वत्र पसरल्या. चारचाकी वाहनातील प्रवाशांसह काही पादचारीही या मोठ्या अपघातातून बचावले. तारा खाली लोंबकळत असल्याने कोणीच रस्ता ओलांडत नव्हते. परिस्थितीचे भान ठेवत तेथील स्थानिक पत्रकार, रहिवासी शांताराम पाईकराव, थांगप्पन नादार यांनी तातडीने रस्त्यावर आडवे खांब टाकून रस्त्यावरील वाहतूक थांबविली. स्थानिकांनी तातडीने एमएसईबीशी संपर्क साधून विजेचा प्रवाह बंद करण्यास सांगितले. त्यानंतर एमएसईबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रस्त्यावरील विजेच्या तारा बाजूला केल्या.
विजेच्या तारा जोडण्याचे काम त्यांनी तातडीने सुरू केले, परंतु तब्बल चार तासांनी वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. त्यानंतर पुन्हा विजेचा लपंडाव सुरुच होता. त्यामुळे नागरिक, व्यापारी, हॉटेलवाले, दुकानदार, सायबर कॅफेवाले कमालीचे हैराण झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Electric bolts broken in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.