मुंबईच्या उपनगरात विजेचा लपंडाव

By admin | Published: June 8, 2017 02:24 AM2017-06-08T02:24:14+5:302017-06-08T02:24:14+5:30

मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत

Electric scatter in Mumbai suburbs | मुंबईच्या उपनगरात विजेचा लपंडाव

मुंबईच्या उपनगरात विजेचा लपंडाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कुर्ला, मरोळ या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यावर हेल्पलाइनवरून काहीच मदत मिळत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पॉवरच्या विलेपार्ले ते मरोळ, एअरपोर्ट रोड, जोगेश्वरी, गोरेगावपर्यंतच्या भागात साधारणत: १८ ते २४ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ऐन उकाड्यात विजेचा लंपडाव सुरू असल्याने रहिवासी उकाड्याने हैराण झाले आहेत. शिवाय जून महिन्यातही वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असून, टाटा पॉवरकडून रहिवाशांच्या समस्येची काहीच दखल घेतली जात नाही.
३ जून रोजी १८ तास, १३ मे रोजी २४ तास आणि अन्य साधारणत: ३५ वेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे वीजपुरवठा खंडित झाला असतानाच हेल्पलाइनवरून काहीच मदत मिळत नाही. उपकेंद्रावर रहिवासी दाखल झाले असता मरोळ येथील केबल नादुरुस्ती, भारनियमन, डबल केबल फॉल्ट अशी अनेक कारणे यावर दिली जातात. परिणामी, वीज कंपनीने या समस्येची दखल घ्यावी आणि समस्या सोडवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
पश्चिम उपनगरात अनियमित वीजपुरवठ्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे टाटा पॉवरने खंडन केले आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत पश्चिम उपनगरातील बहुतांशी ग्राहकांनी केलेल्या तक्रारी चेंजओव्हर ग्राहकांच्या होत्या. या ग्राहकांना आम्ही वीजपुरवठा करत नाही. टाटा पॉवर नेटवर्कच्या काही ग्राहकांचा दोन डबल केबल फॉल्टमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. विविध सरकारी आणि खासगी संस्थांमार्फत केल्या जात असलेल्या खोदकामामुळे हे डबल फॉल्टचे प्रकार घडले होते. या प्रकाराची दखल तातडीने घेण्यात आली, असे स्पष्टीकरण टाटा पॉवरकडून देण्यात आले आहे.

Web Title: Electric scatter in Mumbai suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.