ऐन सणासुदीत वीज महागली; प्रति युनिट ३५ पैसे भार, बिलावर काय परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:49 AM2023-10-15T06:49:58+5:302023-10-15T06:50:20+5:30
कंपनीच्या अकार्यक्षमतेचा फटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.
- कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणासुदीच्या काळात महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारून पुन्हा वीज महाग करीत ग्राहकांना मोठा ‘शॉक’ दिला आहे. कंपनीच्या नवीन आदेशानुसार, घरगुती ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जास्त द्यावे लागतील. कंपनीच्या अकार्यक्षमतेचा फटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी सप्टेंबरमध्ये वापरलेल्या विजेवर इंधन समायोजन शुल्क वसूल करीत आहे. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरूच राहणार आहे. कंपनीच्या आदेशाचा परिणाम बीपीएल श्रेणीतील ग्राहकांवरही होणार आहे. यासोबतच कृषी जोडणीसाठी प्रति युनिट १० आणि १५ पैसे तसेच उद्योगांना प्रति युनिट २० पैसे जास्त द्यावे लागतील.
घरगुती ग्राहकांवर काय परिणाम होणार?
श्रेणी अतिरिक्त शुल्क
(युनिट) (प्रति युनिट/पैसे)
बीपीएल ५
१ ते १०० १५
१०१ ते ३०० २५
३०१ ते ५०० ३५
५००च्या वर ३५
अतिरिक्त वीज खरेदी
महावितरणला मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अल्पकालीन करार आणि पॉवर एक्सचेंजद्वारे १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली.