सहा लाख पुणेकर भरताहेत मोबाईलवरून वीजबिल
By admin | Published: April 29, 2016 01:37 AM2016-04-29T01:37:03+5:302016-04-29T01:37:03+5:30
हावितरणने सुरू केलेल्या सुविधेचा लाभ पुण्यातील तब्बल ६ लाख ५९ हजार १३३ ग्राहक घेत आहेत.
पुणे : तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने सुरू केलेल्या सुविधेचा लाभ पुण्यातील तब्बल ६ लाख ५९ हजार १३३ ग्राहक घेत आहेत. गेल्या महिन्यात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पुणे परिमंडळातील ६० हजार ९०५ ग्राहकांनी आपल्या मोबाईलची नोंदणी या सुविधेसाठी केली आहे. महावितरणकडून विविध ग्राहकसेवांसह वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती सध्या प्रायोगिक तत्त्वावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्वच वीजग्राहकांना वीजबिलाचा एसएमएस पाठविण्यात येत आहे. याशिवाय इमेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना इमेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे.
कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपवर आॅनलाईन बिलभरणा करणाऱ्या वीजग्राहकांनाही संपर्क क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या सुविधेचा सर्वाधिक वापर पिंपरी विभागात होत असून, तेथील ९९ हजार ८९ ग्राहकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ कोथरूडमध्ये ७९ हजार ५८८, भोसरीमध्ये ५१ हजार ८४९, बंडगार्डनमध्ये ८५ हजार ३०५, शिवाजीनगरमध्ये ५३ हजार ८५७, नगर रोडमध्ये ५६ हजार ९२३,
पद्मावतीमध्ये ६० हजार ४५९, पर्वतीमध्ये ७३ हजार ९९३, रास्ता पेठमध्ये ५१ हजार ८२२, तर मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागांत एकूण ४६ हजार २४८ वीजग्राहकांनी स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची महावितरणमध्ये नोंदणी केलेली आहे.