‘एनआरसी’ला भरावेच लागणार वीजबिल
By admin | Published: April 26, 2016 03:38 AM2016-04-26T03:38:38+5:302016-04-26T03:38:38+5:30
मोहने येथील एनआरसी कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली होती. याप्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
कल्याण : मोहने येथील एनआरसी कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली होती. याप्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर, न्यायालयाने कंपनीला वीजबिलाची थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. कंपनी जोपर्यंत थकबाकी भरत नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे महावितरण कंपनीने स्पष्ट केले.
९ नोव्हेंबर २००९ ला एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक डबघाईचे कारण देत कंपनीला टाळे ठोकले होते. कंपनी बंद झाली असली तरी कंपनीच्या कामगार वसाहतीत तीन हजार कामगार कुटुंबे राहत आहेत. कंपनीने पाच कोटी ८१ लाख रुपयांचे वीजबिल थकवल्याने ‘महावितरण’ने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. परंतु, कंपनी व्यवस्थापनाला थकबाकीची रक्कम मान्य नसल्याने ते बिल भरत नव्हते. ‘महावितरण’ने जादा थकबाकी दाखवल्याचे कंपनीचे म्हणणे होते. त्यामुळे कंपनी ‘महावितरण’विरोधात उच्च न्यायालयात गेली होती. न्यायालयाने वीज थकबाकीप्रकरणी २२ एप्रिलला निकाल दिला. त्यानुसार, एनआरसी कंपनीने ‘महावितरण’ची थकबाकी प्रथम भरावी, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार, त्वरित थकबाकी भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अन्यथा हा पुरवठा खंडितच राहील, असे महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी भरत पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)