विजेचे बिल आता आणखी सुटसुटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2017 04:20 AM2017-04-01T04:20:05+5:302017-04-01T04:20:05+5:30
महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला असून सुटसुटीत माहितीसह महावितरणच्या वीजग्राहकांसाठी असलेले
मुंबई : महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला असून सुटसुटीत माहितीसह महावितरणच्या वीजग्राहकांसाठी असलेले मोबाइल अॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी या वीजबिलात क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला असून, महावितरणचे नव्या स्वरूपातील वीजबिल वीजग्राहकांना वितरित करण्यात येत आहे.
सद्य:स्थितीत बारकोडपेक्षाही अधिक लोकप्रिय व वापर सुरू असलेला क्यूआर कोड या वीजबिलात उपलब्ध आहे. या कोडद्वारे वीजग्राहकांच्या सेवेसाठी असलेले महावितरण मोबाइल अॅप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाइलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाइल अॅपची लिंक उपलब्ध होत आहे. त्याद्वारे अॅप डाऊनलोड करता येणे शक्य झाले आहे, असे भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महावितरणने विविध ग्राहकसेवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या अॅपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाइल अॅप डाऊनलोड केले आहे. या अॅपमधून उच्च व लघुदाब नवीन वीज जोडणीची मागणी करता येत आहे.
वीजसेवेसाठी अॅपमध्येच उपलब्ध टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरमध्ये तक्रार नोंदविण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्ययावत करण्याची सोय आहे.
मीटर रीडिंग न घेतलेल्या वीजजोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येत असून संबंधित ग्राहकांना त्यांच्या मोबाइलमधील अॅपद्वारे मीटर रीडिंग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.
‘अॅप’च्या माध्यमातून ग्राहकांना चालू व मागील देयके पाहणे, देयके भरणे, नवीन जोडणीची मागणी करणे, तक्रार दाखल करणे, फिडबॅक देणे या सेवा उपलब्ध आहेत.
मोबाइल क्रमांकासह ई-मेल आयडीची नोंद करा
सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणने एसएमएसवर वीजबिल व वीजपुरवठया संदर्भात माहीती देण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकासह इ-मेल आयडीची नोंद महावितरणकडे असणे गरजेचे आहे.
परिणामी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंद करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले होते. त्यानुसार भांडूप परिमंडलातील एकूण १७ लाख २८ हजार ग्राहकांपैकी १२ लाख ५६ हजार ९२० ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. १ लाख ५८ हजार १६७ ग्राहकांंनी ई-मेल आयडीची नोंद केली आहे.
मोबाईल क्रमांकाच्या तुलनेत ई-मेल आयडीची नोंद कमी आहे. परिणामी उर्वरित ग्राहकांनी मोबाईल क्रमांकासह ई-मेल आयडीची करावी, असे आवाहन भांडुप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता सतिश करपे यांनी केले आहे.
मोबाईल क्रमांक जर नोंद असेल तर ग्राहकांना बिल एसएमएसद्वारे मिळू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे वीज बिल मिळाले नाही किंवा मिळालेले वीज बिल हरवले तर या एसएमएसचा फायदा ग्राहकांना होणार आहे.