रिडिंग न घेताच दिले वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 02:51 AM2016-11-19T02:51:47+5:302016-11-19T02:51:47+5:30

पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे.

Electricity bill paid without taking the reading | रिडिंग न घेताच दिले वीज बिल

रिडिंग न घेताच दिले वीज बिल

googlenewsNext


कळंबोली : पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे. त्यानंतर एकदम अवाच्या सव्वा बिल धाडून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. कळंबोलीत असा प्रकार सर्रास सुरू आहे. देयके भरण्याच्या तारखेनंतर काहींना बिल येत आहे आणि हे बिल न भरल्यास लगेच वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली या ठिकाणी महावितरणची वीज यंत्रणा सातत्याने कोलमडते. कळंबोलीत तर वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असून केबल जळण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. पनवेल आणि नवीन पनवेलमध्येही हीच स्थितीआहे. याशिवाय बिल आकारणीतही कमालीच्या त्रुटी आहेत.
मीटरचा फोटो घेऊन रिडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे याकरिता महावितरण कंपनीने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत; परंतु कित्येक ग्राहकांना अंदाजे बिल पाठवले जात आहेत. काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून भरमसाट बिल पाठवले जात आहे आणि ते भरण्यास विलंब झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. काही बिलांवर तर रिडिंग वेगळे, फोटो दुसरा तर बिल तिसऱ्याचेच पाठवले जात आहे. गेल्या महिन्यात पनवेलमधील अनेक ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीज बिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
वाढीव बिलाच्या तक्र ारी नेमक्या कुठे करायच्या, याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. कळंबोलीतील ग्राहकांना खांदा वसाहतीत जाण्यास सांगितले जाते. कळंबोली सेक्टर १४ येथील आशीर्वाद सोसायटीतील युनिट क्र मांक ४ मधील ग्राहकाला सप्टेंबर महिन्याचे बिल अंदाजे देण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात दुप्पट बिल पाठविण्यात आले. बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याकरिता कर्मचारी धाडला, असे प्रकार कळंबोलीत अनेक ग्राहकांबाबत घडले आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरण कार्यकारी अभियंता डी.बी. गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
>वीज ग्राहकांना नोटिसा द्या
अनेकदा वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे बिलामध्ये प्रचंड घोळ असतो. काही वेळेस ती बिले उशिरा वितरित केली जातात. या गोष्टीला महावितरण कंपनी जबाबदार आहे. तेव्हा वीजपुरवठा खंडित करीत असताना संबंधित ग्राहकांना नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे मत पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Electricity bill paid without taking the reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.