वीजबिल भरणा केंद्र मागणीकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 21, 2016 04:13 AM2016-05-21T04:13:38+5:302016-05-21T04:13:38+5:30
कुडूस येथे जिल्हा बँकेत सुरू असलेले वीजबिल भरणा केंद्र एप्रिल महिन्यात बंद केले.
वाडा : कुडूस येथे जिल्हा बँकेत सुरू असलेले वीजबिल भरणा केंद्र एप्रिल महिन्यात बंद केले. त्यानंतर मागणी करूनही भरणा केंद्र सुरू न केल्यामुळे आमच्या मागणीला केराची टोपली दाखविली गेल्याचा आरोप गावातील ज्येष्ठ नागरिक संस्थेने केला आहे.
कुडूस ही मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. हजारावर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. येथील पंचक्रोशीतील ५२ गावांतील वीजग्राहक वीजबिल भरण्यासाठी कुडूस येथेच येतात. इतर गावांत बँका नाहीत. अथवा बिल भरण्यासाठी पर्यायी सुविधा नाहीत. खाजगी आॅनलाइन केंद्रात ग्राहकांची जास्त पैसे घेऊन लूट केली जाते. हे वास्तव लक्षात घेऊन कुडूस ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी कुडूस येथे वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी एप्रिल महिन्यात केली होती.
या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने कुडूस परिसरातील नागरिकांना १०० रुपये खर्च करून २० किमी लांब अंतरावरील वाडा येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन रांग लावावी लागते. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. (वार्ताहर)
वीजग्राहकांना होणारे त्रास
मीटर रीडिंग मुद्दाम न घेताच बिले देणे अंतिम मुदत संपल्यावर ग्राहकांना बिल देऊन दंडवसुली करणे. ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, शिवाय बिल भरणा सुविधा नसणे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तरी याची दखल घेऊन कुडूस येथे भरणा केंद्र सुरू करावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.