राज्यात अनेक भागांत वीज कोसळून २० जणांचा मृत्यू, दुस-या दिवशीही पावसाने दिला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 06:09 AM2017-10-08T06:09:00+5:302017-10-08T06:09:37+5:30
परतीच्या पावसाने सलग दुस-या दिवशी राज्याच्या अनेक भागांत थैमान घालून शनिवारी २० जणांचा बळी घेतला. वीज कोसळून मराठवाड्यात दहा जणांना जीव गेला.
मुंबई : परतीच्या पावसाने सलग दुस-या दिवशी राज्याच्या अनेक भागांत थैमान घालून शनिवारी २० जणांचा बळी घेतला. वीज कोसळून मराठवाड्यात दहा जणांना जीव गेला. नगरमध्ये ३, विदर्भात २, रायगड व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी २, तर सातारा जिल्ह्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला. येत्या २४ तासांत राज्याच्या बहुतांशी भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजही जोरदार पाऊस कोसळत असताना कडाडणाºया विजांमुळे अंगाचा थरकाप होत होता. मुंबई शहर व उपनगरात पावसामुळे चाकरमान्यांचे घरी जाताना खूप हाल झाले.
रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. महाडजवळ किन्हेरी परिसरात वीज अंगावर कोसळून प्रफुल उमेश कदम (३६ , रा. अंबवडे) व दिलीप शंकर साळवी (३८ रा. कुर्ला) हे दोघे मृत्युमुखी पडले.
बीडमध्ये धारूर तालुक्यात चारदरी येथे झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. त्यातील पाच जण जागीच ठार झाले असून, पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात राधाबाई दामोदर कोळसे (५५) मृत्युमुखी पडल्या.
औरंगाबाद जिल्ह्यात ढाकेफळ (ता. पैठण) परिसरातील येळगंगा नदीच्या पुलावरून जात असताना, रामेश्वर दशरथ शेरे या कामगाराचा वीज पडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे संदीप कचरू सोनवणे हा २२ वर्षीच्या तरुणाचाही विजेने बळी घेतला.
पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारात झाडाखाली थांबलेल्या यशोदा संदीप फासाटे यांचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सत्यभामा आप्पासाहेब फासाटे अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यात धोपटेश्वर गावात शेतात काम करत असलेल्या चंद्रभागा विष्णू दाभाडे यांचा मृत्यू झाला.
मध्य महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले. नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतात काम करणाºया कडूबाई उर्फ लता संजय पवार वीज पडून मृत्युमुखी पडल्या, तर १२ महिला जखमी झाल्या़ या जिल्ह्यात आणखी दोघे वीज पडून मरण पावले. सातारा जिल्ह्यात कणूर (ता. वाई) येथील बबन राजपुरे यांचाही वीज पडून बळी गेला.
विदर्भात नागपूरसह भंडारा, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. डोणगाव येथे गणेश शंकर पळसकर (३८) यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. भंडाºयात एकजण दगावला.
यांना बसला तडाखा
मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, रायगड,
मध्य महाराष्ट्रात नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तसेच मराठवाड्यात औरंगाबादसह बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि विदर्भात नागपूरसह अनेक जिल्ह्यांत परतीचा पाऊस कोसळला.
आजही मुसळधार?
येत्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़