वीजग्राहकांना आता मिळणार अचूक बिल, अडीच लाख नादुरुस्त मीटर बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:33 AM2018-04-04T05:33:15+5:302018-04-04T05:33:15+5:30
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबतचे अचूक बिल देणे शक्य होणार असून, नादुरुस्त मीटरमुळे महावितरणचा होणारा आर्थिक तोटा थांबणार आहे.
मुंबई - महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबतचे अचूक बिल देणे शक्य होणार असून, नादुरुस्त मीटरमुळे महावितरणचा होणारा आर्थिक तोटा थांबणार आहे.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत आजघडीस भांडुप, कल्याण, कोकण व नाशिक असे चार झोन येतात. यामध्ये सुमारे ७० लाख इतक्या ग्राहकांना महावितरण सेवा पुरवत आहे. यातील काही ग्राहकांना नादुरुस्त मीटरमुळे कधी कमी, तर कधी वाढीव बिल जात होते. त्यामुळे वाढीव बिल आल्यास ग्राहकांना बिल दुरुस्त करून घेण्याचा मनस्ताप होत होता, तर वापरलेल्या युनिटपेक्षा कमी बिल गेल्यास महावितरणला आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती.
परिणामी, ग्राहकांकडून प्राप्त होणाºया तक्रारी व आयटी विभागाच्या अहवालानुसार, मागील तीन महिन्यांत कोकण प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बंद वीजमीटर, डिस्प्ले खराब झालेले मीटर, तसेच नादुरुस्त मीटर (वीजबिलाची कमी-अधिक नोंद) बदलण्यात आले आहेत. यामध्ये विजेच्या वापराबाबतच्या नोंदीकरिता गोल चक्र असणारे, तसेच जुन्या प्रकारचे इलेक्ट्रो मग्नेटिक मीटरही बदलण्यात आले आहे.
२७ मार्च अखेर बदलण्यात आलेल्या नादुरुस्त मीटरची आकडेवारी
भांडुप परिमंडळ - सुमारे ८६ हजार (ठाणे शहर व परिसर, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, पनवेल शहर)
कल्याण परिमंडळ - सुमारे १ लाख ७ हजार (कल्याण, पालघर, पेण, वसई)
कोकण परिमंडळ - सुमारे १८,८०० (रत्नागिरी व सिंधुदुर्ग)
नाशिक परिमंडळ - सुमारे ४९ हजार (नाशिक, अहमदनगर, मालेगाव)
२७ मार्चअखेर
बदललेले नादुरुस्त मीटर
पनवेल विभाग - २३,३०० नेरूळ विभाग - ८,३०० वाशी विभाग - १३,८००
भांडुप विभाग - ५,२०० मुलुंड विभाग - ४,९०० ठाणे १ विभाग - ५,८००
ठाणे २ विभाग - ८,००० ठाणे ३ विभाग - ४,२०० वागळे इस्टेट - १२,४००
नादुरुस्त मीटर बदलण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित ग्राहकांना योग्य बिले मिळणार आहे. यापूर्वी वाढीव बिले गेलेल्या ग्राहकांना त्यांच्या बिलात समायोजन (अॅडजेस्टमेंट) करून बिल देण्यात येईल. सदोष मीटरमुळे कमी बिले गेलेल्या ग्राहकांना नवीन मीटर बसविल्यानंतर प्रत्यक्ष विजेचा वापर आणि पूर्वीचे नादुरुस्त/स्लो मीटर यांच्या वापरातील मागील तीन महिन्यांच्या बिलांचे समायोजन पुढील बिलात करण्यात येईल.
- सतीश करपे, संचालक, महावितरण प्रादेशिक.