वीज महागली !
By admin | Published: April 2, 2015 04:51 AM2015-04-02T04:51:24+5:302015-04-02T04:51:24+5:30
महावितरणने विजेच्या दरात प्रति युनिट २७ पैशांची वाढ केली असून या महिन्यापासून ती लागू झाली आहे. महाजेनकोचा वाढलेला खर्च आणि उत्पादनापोटी
कमल शर्मा, नागपूर
महावितरणने विजेच्या दरात प्रति युनिट २७ पैशांची वाढ केली असून या महिन्यापासून ती लागू झाली आहे. महाजेनकोचा वाढलेला खर्च आणि उत्पादनापोटी झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून पुढील सहा महिन्यांपर्यंत ही वसुली केली जाईल.
उन्हाळ्यात विजेचा वापर अधिक होत असल्याने जास्त बिल आणि दरवाढीचा बोजाही सर्वसामान्यांवर पडणार आहे. महाजेनकोने वर्ष २०१३-१४मधील उत्पादनखर्चाचा हवाला देत राज्य वीज नियामक आयोगासमोर याचिका दाखल केली होती. आयोगाने महाजेनकोचा दावा ग्राह्य धरत महावितरणला एकूण १२४०.०४ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. आयोगाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की, ही वसुली सामान्य नागरिकांकडून वीज बिलाच्या माध्यमाने सहा महिन्यांपर्यंत करण्यात यावी. त्यानुसार महावितरणने २७ पैसे प्रति युनिट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सूत्रांनुसार काही श्रेणींमध्ये ही दरवाढ कमी अधिक होऊ शकते. परंतु सरासरी दरवाढ २७ पैसे प्रति युनिटच आहे.
आणखी दरवाढीची शक्यता
महावितरणने देखील आयोगासमोर एक याचिका दाखल करून दरवाढ करण्याची मागणी केली आहे. महावितरण सध्या ४,७१७ कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. या पार्श्वभूमीवर एका वर्षासाठी वीज दरवाढीची मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी महावितरणने केली आहे. आयोगाने महावितरणच्या मागणी मान्य करून सामान्य नागरिकांकडून वसुलीचे आदेश दिले तर वीज आणखी २८ टक्के महाग होईल. यावर महिनाभरात निर्णय अपेक्षित आहे.