वीज पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2016 01:46 AM2016-03-03T01:46:23+5:302016-03-03T01:46:23+5:30
विमाननगरमध्ये बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने अक्षय विजय भालशंकर या १८ वर्षांच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा मित्र संतोष चांदणे हाही जखमी झाला आहे़
येरवडा : विमाननगरमध्ये बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने अक्षय विजय भालशंकर या १८ वर्षांच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा मित्र संतोष चांदणे हाही जखमी झाला आहे़
अक्षय हा आईवडील, लहान भाऊ व बहिणीसमवेत कोनार्क कॅम्पस जवळील मजूरवस्तीवर राहत होता. बुधवारी दुपारी घरालगतच्या पत्रा शेडमध्ये लावलेल्या दुचाकीवर तो बसला होता. त्याच्याजवळच त्याचा मित्र संतोष चांदणे हाही बसला होता़ काही अंतरावर त्याचे वडीलही होते़ त्याचे मित्र त्याला खेळायला बोलवत होते़ पण, अक्षय हा मोबाईलवर गेम खेळत बसला़ त्याचवेळी कानठळ्या बसणारा आवाज होऊन वीज कोसळली़ यामुळे त्याच्या मानेला व कानाला गंभीर दुखापत झाली़ तसेच, त्याच्या डोक्याचे केसही जळाले़ त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़
मोबाईलचा विजेशी
संबंध नाही
याबाबत हवामानतज्ज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, मोबाईलमधील लहरींचा असा परिणाम होत नाही. त्यामुळे हा चुकीचा समज आहे. गुरुत्वाकर्षणाकडे खेचल्या जाणाऱ्या विजेच्या लहरी उंच लोखंडी खांब किंवा एखादे उंच झाड यांकडे खेचल्या जाऊ शकतात. परंतु, विजेच्या लहरी मोबाईलकडे खेचल्या जात नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
>> विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
पुणे : गेले ३-४ दिवस ढगाळ वातावरणानंतर बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी अचानक आकाशात ढग दाटू लागले आणि विजेच्या कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. पावासाच्या या जोरदार सपाट्याने शहरात ठिकठिकाणी १२ ते १४ झाडपडीच्या घटना घडल्या. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.३ मिमी पावसाची नोंद पुणे वेधशाळेने केली आहे.
हवेच्या द्रोणीय दाबाचे रूपांतर वादळात झाल्याने पावसाला पोषक वातावरण शहरात तयार झाले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. पाऊस बरसण्याची शक्यता वाटत असतानाही हुलकावणी मिळत होती; मात्र बुधवारी पावसाने हजेरी लावली. सकाळी कडकडीत उन्ह होते; मात्र दुपारी दीड नंतर ढगाळ वातावरण झाले. आकाशात काळोख दाटून आला आणि दुपारी ३ नंतर जोरदार पाऊस पडू लागला. केवळ अर्ध्या तासाच्या पावसात शहराची दुरवस्था समोर आली. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने पावसाची डबकी तयार झाली आहेत, चिखल झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या आॅइलवर पाऊस पडून गेल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे काही रस्त्यांवर दुचाकी घसरून पडण्याच्या घटना झाल्या. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडून रस्त्यात पालापाचोळ्याचा खच तयार झाला होता.