मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल; मुख्यमंत्र्यांचा व्हीसीद्वारे संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:29 AM2022-05-12T06:29:29+5:302022-05-12T06:29:40+5:30
मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री ऑनलाइन सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीला ‘बत्ती गुल’चा फटका बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. तथापि, वीज गेल्याने त्यांचा संपर्क तुटला व नंतर ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.
मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री ऑनलाइन सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री मंत्रालयातील सातव्या माळ्यावरील सभागृहात बैठकीसाठी बसलेले होते. चर्चेअंती एकेक निर्णयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ५.३० च्या सुमारास अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले आणि ओबीसी आरक्षणाबद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली. पंधरा-वीस मिनिटे झाली असताना अचानक वीज गेली. लगेच इन्व्हर्टरवर माईक व यंत्रणा सुरू झाली पण,तोवर मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला होता. दहा मिनिटे प्रयत्न करूनही तो पुन्हा स्थापित होऊ शकला नाही.
२३,४०० मेगावॅट विजेची मागणी
n उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची मागणी वाढत असून, राज्यात बुधवारी २३ हजार ४०० मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदविण्यात आली. आणि त्या तुलनेत पुरवठा देखील तेवढाच करण्यात आला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
n राज्यात बुधवारी कोठेही भारनियमन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, गेल्या २० दिवसांपासून कोणत्याही वाहिनीवर विजेचे भारनियमन झालेले नाही.