वीजपंप दुरुस्तीसाठी विद्यार्थिनी उपाशी!
By admin | Published: February 3, 2016 03:51 AM2016-02-03T03:51:18+5:302016-02-03T03:51:18+5:30
वसतिगृहातील वीजपंप जळण्यास विद्यार्थिनींना जबाबदार धरून त्याच्या दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करत संस्थाचालकाने तब्बल ९८ मुलींना एक दिवस उपाशी
अहमदनगर : वसतिगृहातील वीजपंप जळण्यास विद्यार्थिनींना जबाबदार धरून त्याच्या दुरुस्तीसाठी पैशांची
मागणी करत संस्थाचालकाने तब्बल ९८ मुलींना एक दिवस उपाशी
ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात घडला. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संस्थाचालकाला ताब्यात घेतले आहे.
वसतिगृहातील वीजपंप तुमच्यामुळेच जळाला, तो आधी दुरूस्त करून द्या, असे सांगत जानकीबाई आपटे, बालिकाश्रम संस्थेचे सचिव डॉ. जयंत करंदीकर यांनी आमच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी आम्हाला उपाशी ठेवले, अशी कैफियत विद्यार्थिनींनी मांडली.
सर्व मुलींनी पैसे गोळा करून त्यातून वीजपंपाची दुरुस्ती करावी. तोपर्यंत शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असा फतवाही डॉ. करंदीकर यांनी काढला होता. त्याबाबत कोणाला सांगितल्यास डांबून ठेवण्याची धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे मुलींना मंगळवारी पूर्व परीक्षेचा पेपरही देता आला नाही. (प्रतिनिधी)
संस्थेची मान्यता रद्द करणार?
समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनीही वसतिगृहात जाऊन घटनेची माहिती घेतली आणि मुलींच्या जेवणाची व्यवस्था केली. मुलींचे जबाब घेऊन संस्थेची मान्यता रद्द करण्यासह मुलींना इतर वसतिगृहात हलविण्यासंबंधी
कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बालिकाश्रम संस्थेमधील प्रकाराबाबत समाजकल्याण विभागामार्फत चौकशी
सुरू आहे. याबाबत विभागाने अजून तक्रार दिलेली नाही. तक्रार दिल्यास पोलिसांकडून
योग्य कारवाई केली जाईल.
- अविनाश मोरे,
पोलीस निरीक्षक