मिहानमधील उद्योगांना वीज

By admin | Published: August 12, 2014 01:05 AM2014-08-12T01:05:50+5:302014-08-12T01:05:50+5:30

मिहानमध्ये असलेल्या उद्योगांना नियमित वीज पुरवठा करण्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी

Electricity in the industries of Mihan | मिहानमधील उद्योगांना वीज

मिहानमधील उद्योगांना वीज

Next

आढावा बैठक : मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार
नागपूर : मिहानमध्ये असलेल्या उद्योगांना नियमित वीज पुरवठा करण्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर शहर विकास आढावा, या विषयावर रविभवन येथे आयोजित बैठकीत दिले.
रविभवन येथे झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह, मिहानचे एस.व्ही. चहांदे आणि इतरी अधिकारी उपस्थित होते. मिहानमध्ये होत असलेल्या कार्गोहबसाठी भूमिसंपादनाचे काम तातडीने करावे आणि सेकंड टॅक्सी रनवेच्या कामास सुरुवात करावी.
भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे, तसेच खापरी येथे निर्माण करण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीत बांधलेल्या घरांचा ताबा घेण्याविषयी विशेष प्रयत्न करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
अ‍ॅडव्हान्टेज विदर्भाच्या तयारीला लागा
पालकमंत्र्यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अ‍ॅडव्हांटेज विदर्भ या उद्योजकांच्या परिषदेनंतर विदर्भात आलेल्या उद्योगाचा आढावा घेतला. अ‍ॅडव्हांटेज विदर्भ परिषदेदरम्यान एकूण २४ हजार ८३८ कोटी रुपये गुंतवणुकीचे २८ करार स्वाक्षांकित करण्यात आले. यापैकी ५ प्रकल्पात उत्पादन काम सुरू झाले असून त्यात ६२९ कोटींची गुंतवणूक, ७ प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून त्यात ७२९१ कोटींची गुंतवणूक, ८ प्रकल्पांनी जमीन ताब्यात घेतली असून त्यात ३८३८ कोटींची गुंतवणूक आणि ५ प्रकल्पांना जमिनीकरिता होकारपत्र देण्यात आले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून विदर्भात प्रथमच भेल या नवरत्न कंपनीने २ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. या २८ प्रकल्पांपैकी २० करारात १३ हजार १५५ कोटींची गुंतवणूक नागपूर विभागांतर्गत तसेच ८ करारात १६८३ कोटींची गुंतवणूक अमरावती विभागातील आहेत.
२८ गुंतवणूक करारापैकी बांधकाम सुरू असलेल्या ७ प्रकल्पांपैकी अंबुजा सिमेंट यांचे स्वत:चे सीपीपी आहे. माणिकगड सिमेंट या प्रकल्पास वाढीव विद्युत पुरवठा मंजूर केलेला आहे. पृथ्वी फेरो अलॉईज घटकास फेब्रुवारी २०१४ ला विद्युत पुरवठा मंजूर केलेला आहे. भेल या घटकास विद्युत पुरवठा देण्यास आवश्यक कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्ष काम लवकरच होणे अपेक्षित आहे.
जमीन ताब्यात घेतलेल्या गुंतवणूकदारांनी अर्ज केल्यानंतर विद्युत पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण आली नाही, अशी माहिती उद्योग उपसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी दिली.
डागा हॉस्पिटलचा बारामती
पॅटर्ननुसार विकास करणार
गांधीबाग येथे असलेल्या डागा हॉस्पिटलचा बारामती पॅटर्ननुसार विकास करण्यासाठी हायटेक आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिली. हे हॉस्पिटल महिलांसाठी विशेष असल्यामुळे याकडे जास्त लक्ष देण्यात यावे. सध्या ५०० बेडची मंजुरी असून २०० बेडची अतिरिक्त आवश्यकता असल्याची माहिती बैठकीत सांगण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
निर्वासित वस्त्यांना जमिनीचे पट्टे
निर्वासित वस्त्यांना जमिनीचे पट्टे सिंधी बांधवांच्या नावाने करण्यासाठी एक मोहीम आखून तीन महिन्यात हा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
राज्यात जळगाव जिल्ह्यात सिंधी बांधवांच्या भूखंडाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले होते. त्यानुसार नागपूरसाठीही शासन निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवावा, असे बैठकीत सूचित करण्यात आले. शहरातील खामला, जरीपटका, मेकोसाबाग येथे सिंधी बांधव फाळणीनंतर स्थापित झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील आठवड्यापासून सर्वेक्षण शिबिर घेऊन व्यक्तिगत केसेस निकाली काढाव्यात, यासाठी नगर भूमापन, नायब तहसीलदार व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तीन चमू तयार कराव्यात. या चमूने आलेल्या अर्जाची सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढावे, असे बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity in the industries of Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.