वीज ३७ टक्के कडाडली, ग्राहकांनो..हरकती मांडा! इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:43 AM2023-01-28T05:43:19+5:302023-01-28T05:44:30+5:30
महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीची मागणी केली असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के आहे.
मुंबई :
महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीची मागणी केली असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के आहे. दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार असल्याने राज्यातील वीज ग्राहकांना शॉक बसणार आहे.
राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना ही दरवाढ शॉक देणारी असून, येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर ढकलणारी आहे. महावितरणच्या या भरमसाठ दरवाढ मागणीला राज्याच्या काेनाकोपऱ्यातून वीज ग्राहक व विविध औद्योगिक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा. हरकती नोंद कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे.
इलेक्ट्रिसिटी ड्यूटी एकूण वीज आकारावर घरगुती वीज ग्राहकांना १६ %, व्यापारी वीज ग्राहकांना २१ %, औद्योगिक वीज ग्राहकांना ७.५ % भरावी लागेल.
महावितरणच्या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
३७ % दरवाढीची याचिका जाहीर
ग्राहक वर्गवारी सध्याचे दर २०२३-२४ २०२४- २५
० ते १०० युनिटस् ३.३६ ४.५० ५.१०
१०१ ते ३०० युनिटस् ७.३४ १० ११.५०
३०१ ते ५०० युनिटस् १०.३७ १४.२० १६.३०
५०० युनिटस् वर ११.८६ १६.३० १८.७०
इलेक्ट्रिसिटी ड्यूटीची आकारणी वरील टक्केवारी नुसार स्थिर / मागणी आकार, वहन आकार, वीज आकार व असल्यास इंधन समायोजन आकार या चारही आकारांच्या बेरजेवर लागू राहील.
२०२३-२४ मध्ये ८.९० रुपये प्रति युनिट व २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये प्रति युनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी आहे. सरासरी वाढ दाखविताना अनुक्रमे १४ टक्के व ११ टक्के दाखविली आहे. ग्राहकांच्या डोळ्यांत ही धूळफेक आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे ३७ टक्के आहे. १० टक्क्यांवर दरवाढ हा टॅरिफ शॉक ठरतो. त्यामुळे १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करता कामा नये.
- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना