परळी केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प
By admin | Published: July 9, 2015 01:45 AM2015-07-09T01:45:28+5:302015-07-09T04:44:20+5:30
पावसाअभावी राज्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना बुधवारी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे
परळी (जि. बीड) : पावसाअभावी राज्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना बुधवारी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. खडका धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने येथील पाचवा संचही बुधवारी बंद झाला. त्यामुळे आता १,१३० मेगावॅट ऊर्जेचा तुटवडा जाणवणार आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणात पाणीसाठा नसल्याने केंद्रातील सर्वच संच टप्प्याटप्प्याने बंद करावे लागले.
सोमवारी सकाळी संच क्र. ५ बंद ठेवण्यात आला. रविवारी संच क्र. ४ बंद झाला, तर ५ जून रोजी संच क्र. ६ व दीड महिन्यापूर्वीच पाण्याच्या समस्येमुळे संच क्र. ३ बंद केलेला आहे. बुधवारी सकाळी २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ७ देखील बंद झाला. (प्रतिनिधी)