वीज पडून ९ बकऱ्या ठार; ३ जखमी
By admin | Published: May 11, 2016 07:27 PM2016-05-11T19:27:11+5:302016-05-11T19:27:11+5:30
मेहकर तालुक्यातील मौजे उकळी येथे वीज पडून ९ बकऱ्या ठार तर ३ बकऱ्या जखमी झाल्या
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 11- मेहकर तालुक्यातील मौजे उकळी येथे वीज पडून ९ बकऱ्या ठार तर ३ बकऱ्या जखमी झाल्या. तर दोन जण जखमी झाल्याची घटना ११ मे रोजी दुपारी दिड वाजताचे सुमारास घडली.
रामदास महादु तुरुकमाने यांचे मायखेड शिवारात असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडावर वीज पडली. यामध्ये आंब्याखाली असलेल्या प्रकाश ज्ञानेश्वर शिंदे रा.उकळी यांच्या तब्बल ८ बकऱ्या ठार झाल्या. तर मदन रुस्तुम धांडे रा.उकळी यांची १ बकरी ठार झाली. देविदास उत्तम शिरे यांची एक बकरी जखमी झाली. तसेच अजय अरुण पातळे (१६) तर विठ्ठल केशव औदगे (३०) हे विज पडल्याने जखमी झाले आहेत. यामध्ये जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती समजाच शिवसेना उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, कृउबासचे संचालक रमेश बोरे, उकळीचे सरपंच शिवाजी यशवंते, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग घाटोळ, गजानन पातळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तर प्रभारी तहसिलदार मिरा पागोरे यांचे सुचनेवरुन तलाठी लक्ष्मण सानप, संजाबराव इंगोले, नारायण गारोळे आदींनी घटनेचा पंचनामा केला. दुपारी १ वाजतापासून मेहकर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली
उकळी ते सोनाटी दरम्यान दुपारी १ ते २ वाजताचे सुमारास वादळी वारा झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेली झाडे रस्त्यामध्ये पडली. त्यामुळे जवळपास दोन तास रिसोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.