बेस्टकडून वीज ग्राहकांची लूट?

By admin | Published: September 18, 2016 01:19 AM2016-09-18T01:19:16+5:302016-09-18T01:19:16+5:30

परिवहन तूट वसूल करणे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही गेले तीन महिने ही बेकायदा वसुली सुरूच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली

Electricity looted power consumers? | बेस्टकडून वीज ग्राहकांची लूट?

बेस्टकडून वीज ग्राहकांची लूट?

Next


मुंबई : शहर भागातील वीज ग्राहकांकडून परिवहन तूट वसूल करणे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही गेले तीन महिने ही बेकायदा वसुली सुरूच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आतापर्यंत बेस्टने अशा पद्धतीने दहा लाख वीज ग्राहकांकडून १८३ कोटी रुपये वसूल केले आहेत.
बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेली काही वर्षे आर्थिक नुकसानात आहे. ही तूट वीजपुरवठा विभाग ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल करीत आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ही तूट वसूल बंद करण्याचे आदेश बेस्टला दिले होते. त्यानुसार गेली काही वर्षे सुरू असलेली ही बेकायदा वसुली तत्काळ बंद होणे अपेक्षित होते.
मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये बेस्टने या स्वरूपात ग्राहकांकडून तब्बल १८३ कोटी रुपये वसूल केले आहेत, ही बाब बेस्ट समितीच्या बैठकीत शनिवारी समोर आली. या प्रकरणात एखादी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यास वसूल केलेली ही रक्कम बेस्टला तत्काळ परत करावी लागेल. अशा वेळी एवढी मोठी रक्कम कुठून देणार, असा सवाल सदस्यांनी केला. परंतु तूट वसुलीचा मुद्दा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगापुढे असल्याने याबाबत आता बोलणे उचित नाही, अशी सबब देत बेस्ट प्रशासनाने आपला बचाव केला. (प्रतिनिधी)
>परिवहनचा तोटा वीज ग्राहकांच्या माथी
कुलाबा ते सायन व चर्चगेट ते माहीम या भागांमध्ये बेस्टमार्फत १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.
सुमारे तीन हजार कोटींचा कर्जाचा डोंगर आणि आर्थिक तूट यामुळे बेस्टचा परिवहन विभाग हजार कोटी रुपयांच्या तुटीत आहे.
वीज मीटरमध्ये घोटाळा?
एकीकडे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बेस्ट वीज ग्राहकांकडून परिवहन तूट वसूल करीत असताना सहा हजार वीज मीटर बऱ्याच काळपासून बंद आहेत. हॉटेल्स व व्यावसायिक वीज ग्राहकांचा यामध्ये समावेश असल्याने हा एखादा घोटाळा असण्याचा संशय बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे.सहा हजारांहून अधिक ग्राहक गेले काही काळ बेस्टची वीज मोफत वापरत असण्याची शक्यता आहे. वीज मीटर शून्य रीडिंग दाखवत असल्याने अशा सहा हजार ग्राहकांना अंदाजे वीज बिल पाठविले जात आहे. या गोंधळामागे एखादे रॅकेट असण्याची शक्यता बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केली. यामध्ये अधिकारीही गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Web Title: Electricity looted power consumers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.