आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच राज्य अंधाराच्या खाईत; भाजपचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:52 PM2021-10-14T16:52:04+5:302021-10-14T16:55:57+5:30
केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीने ९ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेप्रमाणे हा साठा उचलावा, असे कळविले होते.
मुंबई - आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळेच राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी गुरुवारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली आहे. ते भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
उपाध्ये म्हणाले, केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीने ९ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेप्रमाणे हा साठा उचलावा, असे कळविले होते. भुसावळ, कोराडी, चंद्रपूर येथील औष्णिक उर्जा निर्मिती प्रकल्पांच्या व्यवस्थापकांना कोल इंडियाने पत्र पाठवून कोळशाच्या उपलब्ध साठ्याची माहिती कळवली होती. या पत्राला महाजनकोने २१ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे कळविले होते. एकीकडे लॉकडाऊन काळात मागणी वाढल्याने वीज बिलांमध्ये वाढ झाल्याचे उर्जामंत्री सांगत होते. तर दुसरीकडे राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे केंद्र सरकारला कळविले जात होते. यातून आघाडी सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. ऊर्जा खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्यातील जनतेला वीज टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या बाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली.
याच बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करायला हवी. राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही या घटनेसंदर्भात अद्याप भाष्य केलेले नाही. राष्ट्रवादीला सत्तेचा माज आल्याचेच यातून दिसते. या घटनेबाबत शिवसेना नेतृत्व लाचारीपोटी मौन बाळगून आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले १० हजार कोटींचे पॅकेज ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण पाहता सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे, असेही उपाध्ये म्हणाले.