भांडुपमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी
By Admin | Published: July 13, 2017 02:07 AM2017-07-13T02:07:07+5:302017-07-13T02:07:07+5:30
पन्नालाल उपविभागात महावितरणच्या विशेष वीजचोरी विरोधी पथकाने २८ लाख ७३ हजार ४१४ रुपयांची वीजचोरी पकडली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील भांडुप विभागांतर्गत येणाऱ्या पन्नालाल उपविभागात महावितरणच्या विशेष वीजचोरी विरोधी पथकाने २८ लाख ७३ हजार ४१४ रुपयांची वीजचोरी पकडली आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांची वीजचोरीविरोधी पथकामार्फत अत्याधुनिक यंत्राद्वारे दोन संशयित ग्राहकांवर नजर होती. या ग्राहकांच्या मीटर तपासणीत यंत्राद्वारे (रिमोट कंट्रोल) फेरफार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित ग्राहकांवर दंडासह गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भांडुप विभागातील सोनापूर येथील खिंडीपाडा परिसरात प्लास्टीक उद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या परिसरात विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या परिसरात महावितरण लक्ष ठेवून असते. या परिसरात पन्नालाल उपविभागातील १५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने आठ दिवस मीटर तपासणी मोहीम राबवली होती. त्यानंतर या टीमने सुमारे १५ संशयित मीटर ताब्यात घेऊन त्यांची ग्राहकांसमोर तपासणी केली. येथील रहिवासी कमरुद्दिन खान व रोहन पाष्टे यांचे भाडेकरू अली अहमद खान यांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे या तपासणीत निष्पन्न झाले.
महावितरणने या वीजचोरी प्रकरणी वीज ग्राहक कमरुद्दिन खान व रोहन पाष्टे आणि त्यांचे भाडेकरू अली अहमद खान या तिघांवर विद्युत अधिनियम, २००३च्या कलम १३५नुसार गुन्हा नोंदवला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप बोरकर, केशव इंगोले, श्रुतिका वेर्णेकर, स्वाती पाटील, रमेश पारधी, गणेश पवार, ओम्कार गोसावी, विजय गडलिंग, जोगेश कोळी, सोपान ठोके, किरण पाष्टे यांनी महावितरणची वीजचोरी विरोधातील ही मोहीम यशस्वी केली.
या दोन्ही मीटरमध्ये आधुनिक स्वरूपातील यंत्र (रिमोट कंट्रोल) बसवून वीजचोरी करण्यात येत होती. कमरुद्दिन खान यांनी केलेल्या वीजचोरीची एकूण रक्कम १७ लाख १२ हजार ३४४ रुपये इतकी आहे.
तर अली अहमद खान यांनी केलेल्या वीजचोरीची एकूण रक्कम ११ लाख ६१ हजार ७० रुपये इतकी आहे. यापैकी अली अहमद खान यांनी केलेल्या वीजचोरीची सर्व रक्कम (११ लाख ६१ हजार ७० रु.) करवाईनंतर महावितरणमध्ये भरली आहे.