वीजबिल थकले, पाणी रोखले, महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:34 AM2017-09-20T00:34:07+5:302017-09-20T00:34:10+5:30
अगोदरच कामगारांचा पगार आणी सुविधा पुरविताना दमछाक झालेल्या भिगवण ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.
भिगवण : अगोदरच कामगारांचा पगार आणी सुविधा पुरविताना दमछाक झालेल्या भिगवण ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे संकट ओढवले आहे, तर पूर्वीच्या ग्रामपंचायतीने हे बिल थकविल्याने भिगवण गावावर ही नामुष्की ओढवल्याचे पदाधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. नागरिकांना होणाºया त्रासामुळे वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
भिगवण गावची लोकसंख्या प्रत्यक्षात २५ हजारच्या पुढे असल्याने त्यातच सणासुदीच्या तोंडावर पाणीपुरवठा होत नसल्याने इथल्या नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पाण्यासाठीचा कर देऊनही ही वेळ आल्याने हे नागरिक प्रचंड संतापले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झाले. तेव्हापासून आजपर्यंत पाणीपुरवठा योजनेसाठीच्या वीजपुरवठ्याचे बिल कधीही थकले नसल्याचे सध्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र, आधीच्या ग्रामपंचायतीने बिल भरल्याने ३० लाख रुपयांची थकबाकी ग्रामपंचायतीवर आहे. ही थकबाकी शासनाने माफ करावी किंवा आमचे विजेचे बिल भरावे, अशी मागणी उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी केली.
याबाबत महावितरण कंपनीचे भिगवण कार्यालयाचे अभियंता अमोल चांगन यांनी जिल्हाभर वसुली कारवाई सुरू असल्याने वरिष्ठ कार्यालय यांच्या सूचनेनुसार या परिसरातील सात ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद केला असल्याचे सांगितले. तसेच, काही ग्रामपंचायतने बिलाची काही प्रमाणात थकबाकी भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे सांगितले.
>कारवाई अन्यायकारक
तीस लाख रुपयांची थकबाकी होत असताना त्याकाळात कारवाई करताना महावितरणचे अधिकारी काय झोपा काढत होते का, आम्ही सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली आहेत. आम्ही ५ लाख ५० हजार बिल भरले असताना पाठीमागे राहिलेल्या थकबाकीसाठी सणासुदीच्या कालावधीत केलेली कारवाई अन्यायकारक आहे. महावितरणने यावर विचार करुन तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी सांगितले.